Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Nashik › अनैतिक संबंधातून युवकाची हत्या

अनैतिक संबंधातून युवकाची हत्या

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 10:59PMउपनगर : वार्ताहर

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने एका युवकाच्या डोक्यावर धारधार हत्याराने वार करीत हत्या केल्याची घटना जेलरोड, पवारवाडी भागात बुधवारी (दि.22)  घडली  आहे. या घटनेत संदीप वसंत मरसाळे (32) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत नाशिकरोड पोलिसांनी संशयित दीपक भगवान पगारे (35) यास अटक केली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नाशिकरोड हादरले असून, परिसरात दहशतीचे वातावरण आहे.  

पवारवाडीतील भैरवनाथनगरमधील संदीप मरसाळे आणि संशयित दीपक पगारे (हल्ली रा. गंगावाडी, एकलहरे) हे पूर्वी एकाच ठिकाणी रहावयास होते. संशयित दीपक याच्या पत्नीशी संदीप याचे प्रेमसंबंध जुळले होते. दीपकला ही बाब कळल्यानंतर त्याने संदीप यास समजावून सांगितले होते. तरीदेखील त्यांचे प्रेमप्रकरण सुरूच होते. या कारणावरून दीपक आणि संदीप यांच्यामध्ये अनेकदा वादही झालेे होते. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास दीपक याने संदीप यास फोन करून पवारवाडीत बोलावून घेतले. काही वेळातच संदीप व त्याचा एक मित्र दुचाकीवर आले. यावेळी दीपक याने धारधार शस्त्राने संदीपच्या डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीपचा जागीच मृत्यू झाला. तर हल्लेखोर दीपक हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. घटनेची माहिती कळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संदीप रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. खुनाची घटना परिसरात कळताच नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे करीत आहे.