Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Nashik › ‘व्हय, मी सावित्रीबाई’ एकपात्री नाट्यप्रयोगाला दाद

क्रांतिज्योतीची चरितकहाणी उलगडली

Published On: Sep 03 2018 1:41AM | Last Updated: Sep 03 2018 1:41AMनाशिक : प्रतिनिधी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले जिवाचे रान, त्यासाठी सोसलेल्या वेदना, महात्मा फुले यांना दिलेली खंबीर साथ असा संघर्षमय आयुष्याचा प्रवास ‘व्हय, मी सावित्रीबाई’ या एकपात्री नाटकातून विलक्षण ताकदीने उलगडला. दामिनी जाधव या अभिनेत्रीने नाशिककरांसमोर सावित्रीबाई फुले अक्षरश: जिवंत केल्या. 

निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आयोजित व ‘सपान’ संस्थेतर्फे निर्मित ‘व्हय, मी सावित्रीबाई’ या एकपात्री नाटकाच्या उद्घाटकीय प्रयोगाचे. कुसुमाग्रज स्मारक येथे रविवारी (दि. 2) हा कार्यक्रम झाला. सुषमा देशपांडे लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले होते. दामिनी जाधव यांनी ताकदीचा अभिनय सादर केला. त्यांनी सावित्रीबाई, जोतिबा फुले यांच्यासह अन्य भूमिकाही मोठ्या खुबीने साकारल्या. सावित्रीबाईंच्या जोतिबांशी झालेल्या विवाहाच्या प्रसंगाने नाटकाला सुरुवात झाली. त्यानंतर तत्कालीन समाजाकडून कथित शूद्रांवर होणारे अत्याचार, त्यामुळे व्यथित झालेले जोतिबा, त्यांनी सावित्रीबाईंना दिलेले शिक्षण, त्यामुळे या दाम्पत्याला समाजाकडून झेलावे लागलेले अपशब्द अशा अनेकविध प्रसंगांतून नाटक रंगत गेले. दीडशे वर्षांपूर्वी सावित्रीबाईंनी सनातन्यांशी दिलेला लढा बारीकसारीक प्रसंगांतून जिवंत करण्यात आला. 

नाटकाचे निर्मितीप्रमुख लक्ष्मण कोकणे असून, संगीत रोहित सरोदे यांचे, तर वेशभूषा राहुल गायकवाड यांची होती. नीलेश सूर्यवंशी, धनंजय गोसावी, प्रथमेश देशपांडे, चेतन बर्वे, कार्तिकेय कात्रजकर, उर्वराज गायकवाड यांनी रंगमंच व्यवस्था सांभाळली. प्रारंभी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. नाटकाला रसिकांनी गर्दी केली होती.