Mon, Apr 22, 2019 22:09होमपेज › Nashik › ‘मुक्‍त पदवी’ गेली कुणीकडे?

‘मुक्‍त पदवी’ गेली कुणीकडे?

Published On: Jun 23 2018 1:22AM | Last Updated: Jun 22 2018 11:13PMनाशिक : प्रतिनिधी

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ ही म्हण सर्वांनाच चांगली परिचित आहे. मात्र, एखाद्याच्या बाबतीच हाच अनुभव सहा महिन्यांचा नाही, तर तब्बल चार वर्षांचा असेल तर काय म्हणाल...मेहियोद्दीन शेख नावाचा यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी सध्या हाच अनुभव दुरस्थ शिक्षणाचा दावा करणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कारभाराबाबत घेत आहे.

शेख याने गेल्या चार वर्षांत पदवीसाठी (ड्रिगी) दोनदा अर्ज करून, प्रत्यक्ष भेटून तसेच फोनद्वारे बोलूनही विद्यापीठ प्रशासनाकडून त्याला पदवी तर मिळाली नाहीत, पण दोन्ही प्रत आता विद्यापीठाकडे नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रस्त झालेल्या शेख याने थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पत्र पाठविले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील फुलसांवगी, ता. महागाव येथील मेहियोद्दीन शेख या विद्यार्थ्याने 2015 साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रमुक्त विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर त्याने विद्यापीठाकडे पदवी (ड्रिगी) मिळण्यासाठी अर्ज केला.

मात्र, विद्यापीठ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चुकीचा पत्ता टाकला गेल्याने पोस्टाद्वारे पाठवलेली पदवी प्रमाणपत्र शेख याला मिळालेच नाही. त्यामुळे शेख याने याबाबत विद्यापीठ प्रशासनाशी पत्रव्यवहार तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्याला कोणीही समाधानकारक उत्तर न दिल्याने अखेर वर्षभरानंतर त्याने नाशिक गाठून चौकशी केली असता एकदा पाठवलेले पदवीप्रमाणपत्र न मिळाल्यास त्याची जबाबदार विद्यापीठाची नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे चुकीचा पत्ता असल्याने पदवी मिळल नसल्याचे सांगणार्‍या प्रशासनाकडे पोस्टल परत येणे आवश्यक असताना परतही आले नसल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे शेख याने सांगितल्याप्रमाणे पदवी प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळण्यासाठी विद्यापीठाकडे 2016 मध्ये अर्ज केला. त्यासाठी रितसर शुल्कही भरले, त्याचबरोबर आधी झालेल्या प्रकाराबाबतचे स्मरण पत्रही त्याने जोडूनदिले. मात्र, त्यानंतरही अद्यापपर्यंत शेख यास पदवी मिळालेली नाही. त्यास आता दुसर्‍यांदा आधीचेच कारण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे शेख हा हाताश झाला आहे. शेख हा अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने कठीण परिस्थितीत त्याने मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतले. मात्र, पदवी प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्याने आता थेट मुख्यमंत्र्यांना फॅक्स, तसेच मेल करून आपली व्यथा मांडली आहे.

दरम्यान, एका बाजूला देशभरातील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण तसेच सर्व प्रकारचे कामकाज घर बसल्या करता येत असल्याचा दावा करणार्‍या मुक्त विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र वितरणातील कारभार किती बेफिकीर आहे याचा प्रत्यय या घटनेवरून येत आहे.

नाशिकवारीसाठी तीन हजार रुपये खर्च

यवतमाळ ते नाशिक हे 900 किलोमीटरचे अंतर पार करून येण्यासाठी शेख यास प्रत्येकवेळी कमीत कमी तीन हजार रुपये खर्च येतो. या चार वर्षांत त्याने दोन ते तीन वेळा विद्यापीठात फेर्‍या मारल्या आहेत. तर अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, त्याची परिस्थिती हालाखीची असल्याची अजून किती फेर्‍या मारायचा आणि फेर्‍या मारून विद्यापीठ प्रशासनाकडून दुसर्‍यांदा अर्ज करूनही पदवी उपलब्ध नसल्याने ती मिळवयाची कशी असा प्रश्‍न शेख याच्या समोर उभा आहे.