Thu, Apr 25, 2019 18:17होमपेज › Nashik › भुजबळांवर निबंध लिहा अन् बक्षीस मिळवा 

भुजबळांवर निबंध लिहा अन् बक्षीस मिळवा 

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 1:13AMनाशिक : प्रतिनिधी

माजी मंत्री भुजबळ यांच्या काही समर्थकांच्या सुपीक डोक्यातून आता एक नवी कल्पना अवतरली असून छगन भुजबळ यांच्यासाठी निबंध लिहिण्याची स्पर्धा आयोजित करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे, अशी चर्चा आहे. साहजिकच भुजबळांवर होत असलेला अन्याय हा विषय असेल. निबंध लिहितांना भक्तांच्या भावनांचा महापूर वाहू शकतो. ही शक्यता लक्षात घेता पाचशे शब्दांची लक्ष्मण रेषा आखली जाणार आहे. मुंबईत सोमवारी (दि.26) भुजबळांची सुनावणी असून  त्यावेळी त्यांच्या भेटीनंतर आणि आदेशाननंतरच या मोहिमेचा ‘दीपक’ प्रज्वलित करायचा की नाही, हे ठरविले जाणार आहे.

भुजबळांवर अन्याय होत असल्याचा दावा करत त्यांच्या समर्थकांनी ‘अन्याय पे चर्चा’ हा उपक्रम हाती घेतला होता. जिल्ह्यात त्याच्या अनेक बैठका झाल्या. नंतर मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपाचे एकनाथ खडसे व शेकापचे जयंत पाटील यांचीही भेट घेण्यात आली होती. मात्र, मनसेप्रमुखांचा ठाकरे शैलीतील पाहुणचार खटकल्याने संतापलेला भुजबळांनी या उपक्रमाचा गाशा गुंडळण्याचे फर्मान सोडले. मात्र, भुजबळांवरील प्रेम त्यांच्या समर्थकांना स्वस्थ बसू देत नसल्यामुळे आता सोशल मीडियावर भुजबळांसाठी निबंध स्पर्धा घेण्याची नवी कल्पना आखली जात आहे. सोशल मीडियावर पेज करुन त्यावर समर्थकांना भुजबळांवर होत असलेल्या कथित अत्याचाराबद्दल मन मोकळे करता येणार आहे.

आता समर्थक म्हटल्यावर शब्दांमधून भावनांचा महापूर वाहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पाचशे शब्दाची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. हे भावबंध वाचण्यासाठी तज्ज्ञांची टीम गठित केली जाणार आहे. विजेत्यांना बक्षिसे देण्यासाठी खजिनाही रीता करण्याची तयारी आहे. प्रथम तीन भाग्यशाली भक्तांना अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार व पाच हजार रुपयांचे बक्षिस देऊन सन्मानित केले जाईल, असे समजते. अर्थात ही सर्व तयारी प्राथमिक स्वरुपात आहे. भुजबळ भक्तांच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाईल. सोमवारी (दि.26) भुजबळांच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे. त्यावेळी त्यांचे समर्थक देखील उपस्थित राहणार असून निबंध स्पर्धा घ्यायची की नाही, हा निर्णय भुजबळच घेणार आहेत. पुढे काहीही होऊ शकेल, पण सध्या निबंध स्पर्धेची तयारी जोरात सुरू असल्याचे समजते.