Fri, Jul 19, 2019 14:26होमपेज › Nashik › आचारसंहितेत मनपाचे कामांना कार्यारंभ आदेश 

आचारसंहितेत मनपाचे कामांना कार्यारंभ आदेश 

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 11:04PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेने गेल्या चार महिन्यांत रस्त्यांच्या कामांसह विविध स्वरूपाची 42 कोटी रुपयांची कामे शहरात केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, यातील अनेक कामांना शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेत कार्यारंभ आदेश देण्यात आल्याने ही बाब आचारसंहितेचा भंग नाही का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर काही कामांना जुलै महिना उजाडण्याच्या आतच कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे दर्शविले आहे. यामुळे मनपाच्या या घोळामुळे कामांचे तीनतेरा वाजले आहेत.  

महापालिकेच्या बांधकाम विभागाची बर्‍याच कालावधीपासून विविध कामे प्रलंबित होती. त्या कामांसंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वेळोवेळी खाते प्रमुखांच्या बैठका घेऊन प्रलंबित कामांचा पाठपुरावा करत गेल्या चार महिन्यांत विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशान्वये बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते खडीकरण, डांबरीकरण, स्वच्छतागृहे बांधणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे असे सुमारे 42 कोटी रुपयांची 57 विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मनपाच्या बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या कामांची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली. प्रलंबित कामांबाबत आढावा बैठकीत माहिती घेऊन संबंधित कामांना गती देण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार खातेप्रमुखांनी कामे पूर्ण करून घेतली असली तरी यातील 43 कामे ही आधीचीच मंजूर असल्याने ही कामे केवळ पूर्ण झाली आहेत. खुल्या जागेस चॅनलिंग फेन्सिंग करणे, पावसाळी गटारी टाकणे, जॉगिंग ट्रॅक करणे, मनपा शाळा दुरुस्ती करणे, मोकळ्या जागेत ग्रीन जिम साहित्य बसविणे, गोविंदनगर येथे क्रीडांगण तयार करणे, डीपी रस्त्याच्या साइडपट्ट्यांना पेव्हरब्लॉक बसविणे, सार्वजनिक शौचालयांची बांधणी व दुरुस्ती करणे, विभागीय कार्यालयाच्या इमारतींचे वॉटर प्रूफिंग करणे अशा विविध 43 कामांचा समावेश आहे. यातील रस्ते अस्तारीकरण, काँक्रिटीकरण अशा सुमारे 28 कोटींची 19 कामे पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 14 कोटींची 24 कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

कार्यारंभ आदेश देताना गोंधळ 

या विकासकामांची माहिती सादर करताना प्रशासनाने मात्र अनेक ठिकाणी गोंधळ घातला आहे. त्यात शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मनपा प्रशासनाने 27 जून रोजी दत्त चौक भाजी मार्केट येथील विविध रस्ते काँक्रीट करणे या कामाला कार्यारंभ आदेश दिला आहे. तर दुसरीकडे जुलै महिना उजाडायचा बाकी असताना प्रभाग क्रमांक 29 मधील समता चौक, तानाजी चौक, गणेश चौक या ठिकाणी रस्ते काँक्रीट करणे या कामाला 17 जुलै 2018 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे म्हटले आहे.