Fri, Apr 19, 2019 12:23होमपेज › Nashik › साई पालखी रोडचे काम निकृष्ट दर्जाचे 

साई पालखी रोडचे काम निकृष्ट दर्जाचे 

Published On: Apr 18 2018 12:52AM | Last Updated: Apr 17 2018 11:26PMसिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर  तालुक्यातील वावी ते  शिर्डी दरम्यान साई भक्तांसाठी पायी चालण्यासाठी साई पालखी रोडचे काम सध्या सुरू आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी सतत पाठपुरावा करून साईभक्तांसाठी वावीपासून शिर्डीपर्यंत स्वतंत्र पालखी मार्ग मंजूर करून त्याचे काम आता प्रगतिपथावर आहे. मात्र, सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य रवींद्र पगारयांनी केला आहे.

संबंधित ठेकेदार व त्यांच्याशी हातमिळवणी करणारे या कामावरील शासकीय अभियंता यांच्या सलोख्याने साई पालखी रोडच्या कामाचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. अनेक वेळा स्थानिक ग्रामस्थ डॉ. विजय शिंदे व त्यांचे सहकारी यांनी या कामाबाबत कामावरील संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा केली. मात्र, प्रशासकीय अधिकार्‍यांकडून  डोळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे.सध्या स्थितीत वावी ते दुसंगवाडी दरम्यान काम सुरू आहे. या कामावर साधा पाण्याचा टँकर कधी दिसून आला नाही. वरच्यावर खडी टाकून माती झाकण्याचे काम ठेकेदार करीत आहे. नुकतीच पगार यांच्यासह बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. निकृष्ट दर्जाचे काम सुरू पाहून पगार यांनी तत्काळ अधिकार्‍यांशी चर्चा करून कामबंद करण्याच्या सूचना केल्या. मात्र, खुर्चीवर बसून कामाची पाहणी करणारे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे दिली. कामाची सुधारण्यास सांगण्यापेक्षा तसेच काम सुरू ठेवले.

रस्त्यावर काळ्या मातीच्या थर देऊन त्यावर पाणी न मारताच व कुठलीही रोलिंग न करता तशीच खडी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, याबाबत कामाचा दर्जा किती दिवस टिकेल याबाबत शंका निर्माण होत आहे. काही ठिकाणी खडी टाकून त्यावर डांबर टाकून झाले आहे. परंतु त्यावर रोलिंग न केल्याने रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी डॉ. विजय शिंदे, शिवाजी हालवर, नारायण गेठे, भाऊसाहेब घोटेकर, एकनाथ गायकवाड, किसन पावले आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

Tags  : Nashik, Work, Sai Palkhi, Road, poor, quality