Tue, Nov 20, 2018 06:29होमपेज › Nashik › ‘आयएमए’तर्फे आज कामबंद आंदोलन  

‘आयएमए’तर्फे आज कामबंद आंदोलन  

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:12AMनाशिक : प्रतिनिधी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (दि.30) राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकातील जाचक तरतुदींना विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे शनिवारी (दि.28) काम बंद आंदोलन पुकारले आहे. नाशिक शाखा आंदोलनात सहभागी असून, सकाळी 6 ते सायंकाळी 6 दरम्यान बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व अ‍ॅलोपॅथी डॉक्टर आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकरोड आयएमएचे खजिनदार डॉ.सुनील पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. पलोड म्हणाले की, विधेयकातील जाचक तरतुदी वगळून, यासंदर्भात दुरुस्त्या सुचविल्या होत्या. संसदेच्या समितीनेही दुरुस्तीकरिता विविध बाबी मान्य केल्या होत्या. परंतु, संसदेत बदलांसह विधेयक सादर होत नसल्याने त्यास विरोध केला जातो आहे. आंदोलनात जिल्हाभरातील दोन हजारांहून अधिक डॉक्टर सहभागी होणार आहेत. 

सचिव डॉ. नितीन चिताळकर म्हणाले, की शनिवारी दुपारी बाराला शालिमार येथील आयएमए सभागृहात असोसिएशनची बैठक होईल. यानंतर खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातही मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. 

उपाध्यक्ष डॉ. नीलेश निकम म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयांत त्रुटी आढळल्यास मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया कठोर कारवाई करते. परंतु, विधेयकात संबंधित महाविद्यालयांना पुढील पाच वर्षांत संधी देण्याची तरतूद आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावेल. विधेयकातील तरतुदींमुळे केवळ धनधांडग्यांकरिता वैद्यकीय शिक्षण उरेल. एकंदरीत वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा खालावणार असून, भविष्यात चांगले डॉक्टर मिळणे कठीण होऊन सामाजिक आरोग्य धोक्यात येईल, असे मत डॉ. राजेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्‍त केले.