Sat, Mar 23, 2019 01:55होमपेज › Nashik › ‘हेल्मेट’ जनजागृतीसाठी महिलांची बाइक रॅली

‘हेल्मेट’ जनजागृतीसाठी महिलांची बाइक रॅली

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:48PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

दुचाकीस्वार महिलांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस आयुक्‍तालयातर्फे शहरातून महिला पोलिसांची बाइक रॅली काढण्यात आली. रविवारी (दि.7) त्र्यंबक रोडवरील जलतरण तलावापासून सुरू झालेल्या रॅलीत महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर महिलांनी सहभाग घेतला होता. 

महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वजार्पणाच्या सप्ताहानिमित्त पोलीस आयुक्‍तालयातर्फे महिला दुचाकीधारकांची हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांच्या हस्ते रॅलीस ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. पोलीस उपायुक्‍त माधुरी कांगणे, पोलीस निरीक्षक नम्रता देसाई, सहायक पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह पोलीस दलातील इतर महिला अधिकारी व कर्मचारी तसेच इतर महिलांनी सहभाग घेतला होता. त्र्यंबक नाका सिग्नल, सीबीएस, अशोकस्तंभ, पोलीस आयुक्‍तालयासमोरून शरणपूर रोड आणि तेथून पुन्हा जलतरण तलाव सिग्नलपर्यंत रॅली काढण्यात आली.