Wed, Sep 26, 2018 20:05होमपेज › Nashik › गृहकर्जाद्वारे महिलेचा पोलीस उपअधीक्षकास गंडा

गृहकर्जाद्वारे महिलेचा पोलीस उपअधीक्षकास गंडा

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:13AMनाशिक : प्रतिनिधी

एका महिलेने परस्पर वाढीव गृहकर्ज काढून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षकाची एक लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित संत्रा प्रकाश बोथ (रा. महालक्ष्मी चाळ, पुणे रोड, नाशिक) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस उपअधीक्षक हेमंत कल्याणराव सोमवंशी (रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मालकीचा दिंडोरी रोडवर मधुरम सोसायटीत फ्लॅट आहे. मात्र, संशयित महिला संत्रा बोथ हिने सोमवंशी यांच्या मालकीचा फ्लॅट स्वत:च्या नावावर नसतानाही आणि सोमवंशी यांची पूर्वपरवानगी न घेता नियोजनबद्ध पद्धतीने व कागदपत्रांच्या आधारे 1 फेब्रुवारी 2011 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक-1 व नाशिक महापालिकेतील कागदपत्रांमध्ये फेरफार करून महापालिकेकडून एक  लाख 30 हजार रुपयांचे  गृहकर्ज मिळविले. विशेष म्हणजे या गृहकर्जाचा बोजाही सोमवंशी यांच्या फ्लॅटवर चढविला. सोमवंशी यांनी फ्लॅटचा सातबारा उतारा काढला असता त्यांना फ्लॅटवर गृहकर्ज असल्याचे समोर आले. कर्ज घेतलेले नसतानाही कर्जाची नोंद कशी झाली, याचा तपास केला असता संशयित महिलेने हा प्रकार केल्याचे समोर आला. त्यामुळे त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.