Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Nashik › पंचायत महिला सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या

पंचायत महिला सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Jun 04 2018 1:31PM | Last Updated: Jun 04 2018 1:31PMजळगाव : प्रतिनिधी 

जळगाव-चाळीसगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या सदस्या रूपाली पियुष साळुंखे  (वय-22रा. चाळीसगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. 

रूपाली साळुंखे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रूपाली यांच्या माहेरच्या मंडळींसह नागरीकांची मेहुणबारे पोलिस ठाण्यात गर्दी करून पती पियुष साळुंखे यांच्यासह सासु आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहीवद गटातील मेहुणबारे गणाच्या पंचायत समिती सदस्या रूपाली पियुष साळुंखे रविवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर सर्वजण पुढच्या रूममध्ये झोपले. रूपालीने मधल्या घरात जाऊन आतून कडी लावली. दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. 

नेहमीप्रमाणे सकाळी सर्वजण उठल्यानंतर दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. पतीसह सासू आणि सासऱ्यांनी दरवाजा वाजवून आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. हा प्रकार सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला. रूममध्ये पाहिल्यानंतर रूपालीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीन मृतदेह खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकिय अधिकारी यांनी रूपाली यांना मृत घोषित केले. 

रूपाली साळुंखे यांनी 11 महिन्याची मुलगी असून त्या मेहुणबारे गणाच्या पंचायत समिती सदस्या होत्या. पारोळा तालुक्यातील टिटवा हे रूपाली यांचे माहेर असून या घटनेनंतर माहेरच्या मंडळींनी चाळीसगाव गाठले. दरम्यान, पती पियुष साळुंखे आणि सासू आणि सासरे यांच्यावर मुलीचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि रूपालीच्या मृतदेहावर धुळे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात यावे असा पवित्रा घेत त्यांनी मेहुणबारे पोलीसा स्थानकात ठाण मांडून बसले.