Wed, Nov 21, 2018 21:36होमपेज › Nashik › आयुक्त मुंढेंच्या समर्थनात वॉक फॉर कमिशनर मोर्चा

आयुक्त मुंढेंच्या समर्थनात वॉक फॉर कमिशनर मोर्चा

Published On: Aug 31 2018 3:53PM | Last Updated: Aug 31 2018 3:53PMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरूध्द सत्ताधारी भाजपाने दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावाच्या विरोधात 'मी नाशिककर' या झेंड्याखाली काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत आयुक्तांच्या समर्थनात 'वॉक फॉर कमिशनर' मोर्चा काढला. या मोर्चाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

कर योग्य मूल्य दरात केलेली भरमसाठ वाढ मागे घेतली जात नसल्याचे कारण देत भाजपाने आयुक्तांवर अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी १ सप्टेंबरला विशेष महासभा बोलविली आहे. परंतु, दुसरीकडे मात्र शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत मुंढे यांच्या बाजूने समर्थन देत भाजपाला आव्हान उभे केले. आज, शुक्रवारी (दि.३१ ऑगस्ट)  सामाजिक संघटनांतर्फे मुंढे यांच्या समर्थनात निघणार्‍या वॉक फॉर कमिशनर या मोर्चाकडे विविध राजकीय पक्षांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. सुरूवातीला पोलीस खात्याकडून मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र त्यानंतर जनरेट्याच्या  पुढे पोलिसांना  माघार घ्यावी लागली. 

गोल्फ क्लब मैदान येथून सकाळी मोर्चा निघाला. हा मोर्चा सावरकर जलतरण तलाव, महापौरांचे रामायण निवासस्थान आणि तेथून महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार या मार्गावरून काढण्यात आला. मोर्चात नागरिकांनी 'नही चलेगी- नही चलेगी दादागिरी नही चलेगी, कमिशनर मुंढे आगे बढो हम तुम्हारे साथ है, नो गुंडे ओन्ली मुंढे' अशा विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला.  मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

यावेळी हा मोर्चा महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविण्यात आला. पोलीसांनी आयुक्त मुंढे यांना मोर्चाची कल्पना दिली. त्यानुसार मोर्चातील काही प्रमुख लोकांना  आयुक्तांना भेटण्यासाठी आत सोडण्यात आले.आयुक्तांबरोबर शिष्टमंडळाची चर्चा झाली असता काही नागरिकांनी तुम्हीबाहेर चला आणि इतर नागरिकांशी संवाद साधा, अशी गळ घातली. त्यावर आयुक्तांनी पोलिसांशी चर्चा करून बाहेर येण्यास सहमती दर्शविली. यानंतर मुंढे यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तुम्हा सर्व नागरिकांच्या भावना माझ्यापर्यंत पोचल्या असून, सर्वांचे मी आभार मानतो. यापुढच्या काळात शहरासाठी अधिकाधिक चांगले काम करू. त्यासाठी तुमचे सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहन नागरिकांना करत मुंढे पुन्हा आपल्या कक्षात रवाना झाले. यानंतर पाच सदस्यांचे शिष्टमंडळाने मुंढे यांना निवेदन सादर करत चर्चा केली.