Mon, Apr 22, 2019 12:02होमपेज › Nashik › अवकाळी पावसाचे तुफान

अवकाळी पावसाचे तुफान

Published On: Apr 08 2018 2:03AM | Last Updated: Apr 08 2018 2:03AMचांदवड : वार्ताहर

चांदवड शहरासह तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये शनिवारी (दि.7) दुपारी 4 वाजेच्या सुमारास सुपारीच्या आकाराच्या गारा, वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाने पंधरा ते वीस मिनिटे मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे वातावरणातील उष्णता काहीशी कमी होऊन गारवा निर्माण झाला होता. यामुळे नागरिकांची काही वेळ का होईना उष्णतेपासून सुटका झाली होती. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदे, कांद्यांचे बियाणे, गहू पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडण्याची शक्यता आहे.

दोन ते तीन दिवसांपासून चांदवड तालुक्यातील उष्णता 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचल्याने वातावरणातील उष्णता चांगलीच भडकली आहे. या  उष्णतेमुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. सकाळपासूनच सूर्य आग ओकू लागल्याने उष्णता चांगलीच भडकली होती. यामुळे आकाशात काहीसे काळे ढगदेखील जमा झाले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह सुपारीच्या आकाराच्या गारा पडू लागल्या. त्यानंतर पावसाने मध्यम स्वरूपाची हजेरी लावली.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची उष्णतेपासून थोडावेळ का होईना सुटका झाली होती. या अवकाळी पावसामुळे उन्हाळ कांदे, कांद्याचे बियाणे, गहू या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. चांदवड शहरात पावसाने पंधरा ते वीस मिनिटे चांगली हजेरी लावली. यामुळे शहरातील गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. या गटारीत घाण अडकल्याने गटारीतील पावसाचे सर्व पाणी रस्त्यावरून वाहत होते. आठवडे बाजार, बसस्थानक, सोमवार पेठ अशा रहदारीच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचले होते. चांदवड शहरासह अवकाळी पावसाने गणूर, राहुड, कळमदरे, उसवाड, डोंगरगाव, निमोण, दरेगाव, वाद, वराडी, दुगाव, हरनूल, हरसूल, निकम वस्ती, शिंगवे, मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बुद्रुक आदी गावांमध्ये हलक्या स्वरूपाची हजेरी लावली होती.


मनमाड शहराला झोडपले

हवामान विभागाने दिलेला इशारा खरा ठरला असून, मनमाड शहर परिसरात शनिवारी सायंकाळी मेघगर्जना करीत वादळीवार्‍यासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पाऊस तर कमी झाला मात्र वादळीवार्‍याने धुमाकूळ घालत अनेक घरांचे पत्रे व छप्पर उडवून नेले. कांद्याचे अनेक शेड जमीनदोस्त केले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह कांदा व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले.रेल्वे स्थानकासह शहरातील वेगवेगळ्या भागांत झाडे कोलमडली आहेत. रेल्वे स्थानकावर असलेल्या झाडाची फांदी ओव्हर हेड वायरवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तातडीने वायरची दुरुस्ती करण्यात आली असून, शहरातही विजेच्या तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे.

अचानक वादळी    वारा आणि पाऊस आल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत होऊन बाजारपेठेत आलेल्या लोकांची तारांबळ उडाली होती. पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे काढणीवर आलेला कांदा व गहू पिकांना फटका बसला. त्यामुळे बळीराजाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून, पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतर तापमानात घट झाली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दोन दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. शनिवारी सायंकाळी वादळीवार्‍यासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या.पाऊस बंद झाल्यानंतर वार्‍याचे वादळ आले. वारा इतका जोरात होता की काही घरांचे पत्रे व छप्पर उडाले. काही ठिकाणी झाडे कोलमडली, तर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 च्या मध्यभागी असलेल्या झाडाची फांदी पडून हुज्जू शेख हा वेंडर जखमी झाला. झाडाची फांदी प्लॅटफॉर्म 4 च्या रुळावर पडल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर येणारी तपोवन एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्र.5 वर घेण्यात आली होती.

Tags :  Nashik,  windstorm, rain, suddenly, subsides, 15 to 20 minutes