होमपेज › Nashik › जिल्ह्याला अवकाळीचा दणका 

जिल्ह्याला अवकाळीचा दणका 

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 12:03AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.1) वादळी वार्‍यासह अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांची त्रेधातिरपीट केली. दरम्यान, येवला शहरात रात्री 8 च्या सुमारास तुफान पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

सिन्‍नर तालुक्यातील विंचूरदळवी आणि पांढुर्ली परिसरातील मका आणि फ्लॉवर पिकाचे मोठे नुकसान केले. पांढुर्ली चौफुलीवर वार्‍यांमुळे पत्र्याची टपरी उडून शेजारी असलेल्या देवी मंदिराच्या भिंतीवर पडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मालेगाव तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने सलामी दिली. संवदगावमध्ये वादळी वार्‍यात विजेचा खांब कोसळून म्हैस व पाच शेळ्या गतप्राण झाल्या. देवळ्यात डाळिंब पिकांचे नुकसान झाले असून,  कांदा ओला झाला. विजेच्या तारा तुटल्याने वीजही गायब झाली. हिरामण बागूल यांच्या घराचे पत्रे उडाले. बापू जाधव, देवाजी जाधव यांच्या पोल्ट्री फार्मचे पत्रे उडाले. तर बाबूराव शिरसाठ यांच्या घराचे कौले उडाली. जगन्नाथ चव्हाण, भिला शेवाळे यांच्या गुरांचे शेड उडाले.

विंचूरदळवीला  मका, फ्लॉवर पिकाचे नुकसान 

सिन्‍नर तालुक्यातील विंचूरदळवी आणि पांढुर्ली परिसराला शुक्रवारी (दि.1) सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरश: झोपडून काढले. सुमारे तासभर चालेल्या पावसाने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली. 

वादळी वार्‍यासह अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने पांढुर्ली आणि विंचूरदळवी परिसरातील मका आणि फ्लॉवर पिकाचे मोठे नुकसान केले. वार्‍याचा वेग जास्त असल्याने मका पीक झोपून गेले. विंचूरदळवी येथील विष्णू दळवी यांचा सात एकर मक्याचा प्लॉट भुईसपाट झाला. यामध्ये दळवी यांचे अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर परिसरातील बाबूराव हजारे आणि शिवाजी हजारे यांच्या मालकीच्या आणि नव्यानेच बांधण्यात आलेल्या जान्हवी हाय-टेक नर्सरीला पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला. वादळी वार्‍याने नर्सरीचे शेड कोलमडले. यामध्ये हजारे बंधूंचे सुमारे सात लाखांचे नुकसान झाले.

दुसरीकडे पावसासोबत सोसाट्याचा वारा वाहत असल्याने अनेकांच्या घराच्या छताचे पत्रे उडून गेले. सुदाम दळवी आणि रमेश गायकवाड यांच्या मालकीच्या घराच्या छताचे वार्‍यामुळे दूरवर फेकल्या गेले. त्यामुळे दळवी आणि गायकवाड यांना मोठा अर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. पांढुर्ली चौफुलीवर वार्‍यांमुळे पत्र्याची टपरी उडून शेजारी असलेल्या देवी मंदिराच्या भिंतीवर पडली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

जनावरांसाठी राखून ठेवलेला चारा आणि साठवणीतील कांदा पावसाने भिजल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. पांढुर्ली-भगूर रस्त्यावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वादळी वार्‍यांमुळे महावितरणचे काही खांब वाकल्याने तसेच वृक्ष पडल्याने वीजतारा तुटल्या. त्यामुळे पांढुर्ली आणि विंचूरदळवी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. 

विद्युत खांब कोसळून म्हैस, पाच शेळ्या ठार

मालेगाव : तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने सलामी दिली. सवंदगावमध्ये वादळी वार्‍यात विजेचा खांब कोसळून म्हैस व पाच शेळ्या गतप्राण झाल्या. हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याला पुष्टी देणारा शुक्रवार ठरला. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगांनी गर्दी केली. शहरात टीप टीप झाली तर, दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान माल्हणगाव व चाळीसगाव फाट्यावर जोरदार हजेरी लावली. ग्रामस्थ व शेतकर्‍यांची धावपळ उडाली. 

सवंदगावमध्ये दुर्घटना घडली. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात धर्मा शेवाळे यांच्या गोठ्याजवळील विद्युत खांब कोसळला. यात एक म्हैस व पाच शेळ्या ठार झाल्या. तहसीलदार ज्याती देवरे यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट दिली. तलाठ्यांनी पंचनामा केला. पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला. त्यानंतर मात्र असह्य उकाडा त्रासदायक ठरला.