Thu, Apr 25, 2019 15:28होमपेज › Nashik › राष्ट्रवादी जागा राखणार की सेना इतिहास घडविणार?

राष्ट्रवादी जागा राखणार की सेना इतिहास घडविणार?

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 11:21PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखणार की, शिवसेना इतिहास घडविणार याचा फैसला गुरुवारी (दि.24) मतमोजणीनंतर होणार आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना मनसे, भाजपाचा पाठिंबा मिळाला असला तरी सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी कडवी झुंज दिल्याने निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनीच या निवडणुकीत लक्ष घातल्याने वरिष्ठांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सेनेतून निवडणुकीच्या तोंडावर हकालपट्टी झालेल्या सहाणे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवून    उमेदवारीही पदरात पाडून घेतली. या निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याने सहाणे काँग्रेस आघाडीच्या वतीने रिंगणात उतरले. पक्षाध्यक्षांनी सहाणे यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हा राष्ट्रवादीत नाराजीचे वातावरण होते. दुसरीकडे सेनेने दराडे यांना उमेदवारी देऊन निवडणुकीत रंग भरला. त्यांच्याही उमेदवारीने सेनेत नाराजी व्यक्त केली गेली. भाजपाशी जवळीक साधलेल्या परवेझ कोकणी यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून भाजपाच्याच नगरसेवकांच्या स्वाक्षर्‍या असल्याने कोकणी यांना भाजपाचा छुपा पाठिंबा असल्याचेही बोलले गेले. त्यामुळे सुरुवातीला तिरंगी सामना होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण, कोकणी यांना पुरस्कृत करण्यास भाजपाने नकार दिल्याने त्यांचा हिरमोड झाला. खरी लढत सहाणे आणि दराडे यांच्यातच होणार असल्याचेही स्पष्ट झाले.

दरम्यानच्या काळात लोकसभेच्या पालघर मतदारसंघात सेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्याने या पक्षाचे भाजपासोबत वितुष्ट निर्माण झाले. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजपाने विधान परिषदेच्या निवडणुकीत सहाणे यांना उघडपणे पाठिंबा दिला. मनसेने सहाणे यांना आधीच पाठिंबा जाहीर केल्याने ते महाआघाडीचे उमेदवार झाले. विशेष म्हणजे, सेनेला धडा शिकविण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे आदेश भाजपाला दिले. तर माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांची निवडणुकीच्या धामधुमीतच जामिनावर सुटका झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र अजित पवार यांनीच दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकत सहाणे यांच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. त्या आधी सेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही नाशिकमध्ये येऊन दराडे यांच्या मतांवर दरोडा नको, असे सूचक विधान केले होते. 

सेनेबरोबरच राष्ट्रवादी आणि भाजपानेही प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणूक अंतिम टप्प्यात चुरशीची झाली. त्यातच कोकणी यांची भाजपाविरोधी नाराजी नेमकी कोणी ङ्गकॅशफ केली, हेही महत्त्वाचे ठरले आहे. सहाणे यांच्याकडे काँग्रेस आघाडीची 171 मते हक्काची असून, भाजपाचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या मतांमध्ये 167 मतांची भर पडली. मनसेची सहा मतेही यात आहेत. या तुलनेत दराडे यांच्याकडे सेनेची हक्काची 207 मते तोकडी ठरली. वरकरणी सहाणे यांचे पारडे जड वाटत असले तरी प्रत्यक्षात दोन्ही काँग्रेसमध्येच झालेली फाटाफूट आणि सहाणे यांना पाठिंबा देण्यावरून भाजपामध्येच पडलेले दोन गट पाहता, सरशी नेमकी कोणाची होणार, हे गुरुवारी (दि.24) मतमोजणीनंतर जाहीर होणार्‍या निकालानेच स्पष्ट होणार आहे. अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ङ्गलक्ष्मीदर्शनफ झाल्याची चर्चा आहे. सेनेला या मतदारासंघाने वारंवार हुलकावणी दिली आहे.

गेल्या 24 वर्षांपासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीने ताब्यात ठेवला. शांतारामतात्या आहेर अपक्ष निवडून आल्यानंतर देवीदास पिंगळे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर स्वर्गीय डॉ. वसंत पवार यांनी आधी पूर्ण सहा वर्षे आणि नंतर साडेचार वर्षे या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ठेवला. त्यांच्या निधनानंतर जयवंत जाधव यांनी आधी दीड वर्ष आणि नंतर सहा वर्षे हा मतदारसंघ ताब्यात ठेवला. म्हणजे, आजपर्यंत सेनेचा भगवा या मतदारसंघात फडकू शकलाच नाही. गेल्यावेळी सेनेच्या उमेदवाराचा चिठ्ठीने घात केला होता. पराभवाची ही मालिका खंडित करण्यात सेनेला यावेळी यश येणार काय, याकडेही लक्ष लागले आहे. तसे झाल्यास एकाच वेळी भाजपा, काँग्रेस आणि मनसेला धूळ चारण्याचा इतिहासही सेनेच्या नावावर होऊ शकतो, असे जाणकरांचे म्हणणे आहे.