सिन्नर : प्रतिनिधी
शिवसरस्वती फाउंडेशन व सिन्नर विभागीय दूध संघ यांच्या वतीने तालुक्यात कुपोषण निर्मुलनाचे काम हाती घेण्यात आले असले तरी प्रशासनाकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. बर्याच ठिकाणी अतितीव्र व तीव्र कुपोषित बालकांची संख्या अधिक आहे. ती संख्या नोंदवली जात नाही. त्यांची नावे लपवली जात आहेत. कुपोषण निर्मुलन वस्तुस्थितीला धरुन केले जात नसल्याचा आरोप जि.प. सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी केला.सिन्नर पंचायत समिती कार्यालयात नुकतेच त्यांनी भेट दिली. त्यावेळी गटविकास अधिकारी वाणी यांना त्यांनी माहिती विचारली होती. त्यावेळी त्यांनी एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागातील गंभीर बाबींवर चर्चा केली. कुपोषण निर्मूलनात आढळलेल्या चुकांवर त्यांनी यावेळी बोट ठेवले.
शिवसरस्वती फाउंडेशनतर्फे तालुक्यातील दत्तक घेतलेल्या कुपोषित मुलांच्या तपासणीची तिसरी फेरी पूर्ण करण्यात आली. यावेळी कोकाटे यांनी पोषण आहाराचे वाटप केले. दत्तक घेतलेल्या 67 मुलांपैकी 18 मुले तीव्र कुपोषणातू बाहेर आली आहे. अतितीव्र कुपोषणातील 13 मुलांपैकी 4 मुलांमध्ये सुधारणा झाली आहे. तिघांना दुर्धर आजार असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे उर्वरित कुपोषित मुलांमध्ये सुधारणा बघायला मिळत आहे. मात्र उन्हाळ्यात मुलांच्या संगोपणात अडचणी येत असल्याचे कोकाटे यांनी म्हटले. तालुक्यात एकही अंगणवाडी सकाळी 8 वा उघडत नाही, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली, त्याच बरोबर 0 ते 3 वयोगटातील मुलांचा पोषण आहार हा कार्यकर्ती किंवा कार्यकर्तीच्या नातेवाईकांच्या जनावरांना खाऊ घातला जातो, अशा तक्रारी ग्रामस्थ करत आहेत.
कुपोषणावर काम करत असताना कार्यकर्ती उपस्थित नसतात, प्रशासनाचा त्यांच्यावर कुठलाही अंकुश नाही. अंगणवाडीत उपस्थित बालकांपेक्षा हजेरीपट नेहमी दुपटीने व तिपटीने जास्त दाखवला जातो, या सगळ्या गैरप्रकारांना जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत कोकाटे यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले. यावेळी बाजार समिती माजी सभापती अरुण वाघ, योगेश घोटेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी लता गवळी, पर्यवेक्षक अनुराधा राऊत, एफ. के. बढे, एस. बी. शिंदे, वैद्यकीय अधिकारी गाढे आदी उपस्थित होते.
Tags : Nashik, figures, malnourished, children, hidden