Wed, Mar 27, 2019 06:25होमपेज › Nashik › ‘त्या’ हिंदुत्ववादी संघटनांची चौकशी का नाही? : अविनाश पाटील 

‘त्या’ हिंदुत्ववादी संघटनांची चौकशी का नाही? : अविनाश पाटील 

Published On: Aug 06 2018 1:53AM | Last Updated: Aug 05 2018 11:55PMनाशिक : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांना अटक करण्याची राजकीय इच्छाशक्‍तीच नसून, या संशयितांना राज्य सरकारकडून पाठीशी घातले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला. या प्रकरणी सनातन, हिंदू जनजागृती समिती व श्रीराम सेना ही नावे सरकारने आरोपपत्रात नमूद करूनही या संघटनांची अद्याप चौकशी का केला जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला येत्या 20 ऑगस्ट रोजी 5 वर्षे पूर्ण होत असूनही त्यांच्या मारेकर्‍यांचा तपास लागलेला नाही. डॉ. दाभोलकर यांचा खून खासगी बाबीतून नव्हे, तर विचारांच्या विरोधातून झाला असल्याची बाब तपासी यंत्रणांना स्वीकारायला दोन-अडीच वर्षे लागली. गेल्या 5 वर्षांत एनआयए, सीबीआय, एसआयटी, सीआयडी व एटीएस अशा देशातील व राज्यातील सर्वोच्च तपास यंत्रणांकडूनही या प्रकरणाचा तपास लागलेला नाही.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश या चौघांच्या हत्या प्रकरणातील फरार व सध्या अटकेत असलेले सर्व संशयित सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती व श्रीराम सेनेशी संबंधित आहेत. तसे सरकारनेच आरोपपत्रात म्हटले आहे. तरी या संस्थांची चौकशी का केली जात नाही, सनातनचे संस्थापक आठवले यांच्यावर कारवाई का होत नाही, या संस्थांचे प्रवक्‍ते जाहीरपणे धमक्या देत असूनही त्यांची दखल का घेतली जात नाही, सनातनच्या पनवेल येथील आश्रमात नशेची औषधे वाटली जात असूनही त्याविरोधात पावले का उचलली जात नाहीत, असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत. 

पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मिळत नाही, मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी बैठक बोलावण्याची मागणी करूनही ते कार्यवाही करीत नाहीत. राजकीय इच्छाशक्‍तीच्या अभावातून हे घडत असून, अंनिस नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला यासंदर्भात उत्तर देणे अपेक्षित आहे. या संस्थांवर सिमीप्रमाणे कायमची बंदी आणावी, अशी अंनिसची मागणी आहे. या पार्श्‍वभूमीवर अंनिसने ‘जवाब दो’ मोहीम सुरू केली असल्याचेही पाटील म्हणाले. 

खासदार, आमदारांना पत्रे

डॉ. दाभोलकर खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळावी, त्याबद्दल आवाज उठवावा, यासाठी अंनिसतर्फे देशभरातील 700 खासदारांना व राज्यातील सर्व आमदारांना पत्रे लिहिण्यात आली आहेत. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला 5 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल अंनिसचे शिष्टमंडळ खासदार, आमदारांना भेटणार असून, त्यांना जाब विचारणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच 20 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.