Wed, Apr 24, 2019 16:38होमपेज › Nashik › रजा मंजूरसाठी लाच घेताना दोघे लिपीक अटक 

रजा मंजूरसाठी लाच घेताना दोघे लिपीक अटक 

Published On: Jun 18 2018 8:00PM | Last Updated: Jun 18 2018 8:00PMहिंगोली : प्रतिनिधी

जीपीएफचे बील मंजूर करून देण्यासाठी तसेच अर्जीत रजा मंजूर करून दिल्याचा मोबदल्यात ३०० आणि ५०० रूपयांची लाच घेताना पुर्णा पाटबंधारे विभागातील दोघा लिपीकांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने रंगेहात अटक केली. आज, सोमवार दि. १८ दुपारच्या सुमारास एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. कनिष्ठ लिपीक मधुकर रामचंद्र वाढोणकर (वय-५७), माणिक नरसिंग पुरी (वय-५४) असे या संशयित आरोपीची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, पुर्णा पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या तक्रारदार भुक्तर यांनी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक मधुकर वाढोणकर यांच्याकडे जीपीएफचे बील तयार करून मंजूर करून देण्यासाठी ५०० रूपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी २०० रूपये यापुर्वीच वाढोणकर यांना देण्यात आले होते. उरलेले ३०० रूपयांची मागणी ते करीत होते. तसेच याच कार्यालयातील कनिष्ठ लिपीक माणिक नरसिंग पुरी (५४) हा तक्रारदाराची अर्जीत रजा मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून ३०० रूपये व त्यांच्या स्व्हिहस सिटला नॉमिनी म्हणून त्यांच्या पत्नीच्या नावात झालेली चूक दुरूस्त करून देण्यासाठी २०० रूपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीच्या कार्यालयात केली होती.

या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वाढोणकर व पुरी यांनी लाच मागितल्याने सिद्ध झाल्याने एसीबीच्या पथकाने सोमवारी (दि.१८) दुपारी ४.३० च्या सुमारास पुर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात मधुकर वाढोणकर यास ३०० रूपये तर माणिक पुरी याने ५०० रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दोघा लिपीकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

ही कार्यवाही एसीबीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, शेख उमर, अभिमन्यू कांदे, संतोष दुमाने, विजयकुमार उपरे, महारूद्रा कबाडे, अविनाश किर्तनकार यांच्या पथकाने केली.