Wed, Mar 20, 2019 08:39होमपेज › Nashik › नाशिकवर संक्रांत

नाशिकवर संक्रांत

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:43PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

उत्साही तरुणांची पतंगबाजी आणि नायलॉन मांजाच्या वापराने पशू-पक्ष्यांसह नागरिकांवरही रविवारी संक्रांत कोसळल्याचे पाहायला मिळाले. सातपूरला एका गिधाडाला जीव गमवावा लागला, तर विविध भागांमध्ये सहा पक्षी जखमी झाले. याशिवाय सिडकोत मुलगा जखमी झाला.

सिडकोत मुलगा जखमी 

नाशिक : कटलेला पतंग पकडण्यासाठी पळताना सिडकोतील गणेश चौक परिसरात 12 वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.14) दुपारच्या सुमारास घडली. गणेश धोंडू पारस्कर (12, रा. गणेश चौक) असे या मुलाचे नाव आहे. गणेश दुपारी कटलेला पतंग पकडण्याचा प्रयत्न करीत होता. त्यातच त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सातपूरला गिधाडाचा मृत्यू

नाशिक  : मकरसंक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे सातपूर परिसरात एका दुर्मीळ जातीच्या गिधाडाचा मृत्यू झाला, तर शहरातील विविध ठिकाणी सहा पक्षी जखमी झाले. सातपूरच्या घटनेत जखमी गिधाडाला नागरिकांनी प्रथमोपचार करून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. रक्‍तस्राव झाल्याने या गिधाडाचे प्राण वाचू शकले नाही.  

पतंग उडवताना एकास मारहाण 

नाशिक : प्रतिनिधी

पतंग उडवताना धक्का लागल्याची कुरापत काढून काही संशयितांनी मिळून एकास बेदम मारहाण केल्याची घटना जुने नाशिक परिसरात घडली. यात सागर रमेश सूर्यवंशी (26) हा जखमी झाला आहे. रविवारी (दि.14) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पतंग उडवताना धक्‍का लागल्याची कुरापत काढून पप्पू तोरे, योगेश बिंगारे व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली.