Mon, Jun 24, 2019 21:31होमपेज › Nashik › पाणीटंचाईचा वैशाष वणवा !

पाणीटंचाईचा वैशाष वणवा !

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 11:31PMनाशिक : प्रतिनिधी

वैशाख वणव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक होरपळून निघाले असून, वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता वाढली आहे. एकीकडे प्रमुख धरणांमधील साठा सरासरी 26 टक्क्यांपर्यंत घसरलेला असतानाच जिल्ह्यातील 76 गावे आणि 87 वाड्या-वस्त्यांना 48 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. येत्या काळात हे चित्र अधिक भयावह होणार आहे. 

विदर्भातील तापमान 47 अंशांवर पोहोचले असताना नाशिकमधील तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे चालू वर्षी नाशिककर उन्हाने कासावीस झाले आहेत. वाढत्या उन्हाच्या दाहकतेबरोबर ग्रामीण भागातील पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. धरणांच्या पाणीपातळीतही घट होऊ लागली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 24 प्रमुख धरणांमध्ये सद्यस्थितीत 17 हजार 44 दलघफू म्हणजेच अवघा 26 टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 2233 दलघफू (40 टक्के), तर धरण समूहातील चार प्रकल्प मिळून 4656 दलघफू (42 टक्के) साठा आहे.

त्यामुळे यंदा नाशिक शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. दारणा समूहातील सहा प्रकल्पांमध्ये 4886 दलघफू म्हणजेच 26 टक्के साठा आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणीपातळी खालावली आहे. म्हणून ग्रामीण भागाला टंचाईचा अधिक सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची भिस्त टँकरवर अवलंबून आहे. येत्या पंधरवड्यात नाशिकमधील तापमानात चढउतार होणार आहे. वातावरणातील या सततच्या बदलामुळे उष्म्यात अधिक भर पडणार आहे. त्यामुळे टंचाईच्या झळा अधिक जाणवणार असल्याने टँकरच्या संख्येतही साठी पार करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

येवल्यासाठी 17 टँकर

येवल्याला सर्वाधिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील 34 गावे आणि 19 वाड्या-वस्त्या अशा 53 ठिकाणी 17 टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्याखोलाखाल बागलाणमधील 20 गावांसाठी 14 टँकर सुरू आहेत. मालेगावमधील टंचाईग्रस्त सात गावे व 22 वाड्या-वस्त्यांना सात टँकरने पाणी पुरवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. दरम्यान, गतवर्षी याच काळात टँकरची संख्या कमी होती.

धरणांमधील साठा (दलघफूमध्ये)

गंगापूर : 2233, दारणा : 3114, कश्यपी : 1659, पालखेड : 136, करंजवण : 1694, ओझरखेड 383, पुणेगाव : 97, भावली : 265, मुकणे : 558, कडवा : 300, नांदूरमध्यमेश्‍वर : 253, भोजापूर : 13, चणकापूर : 759, हरणबारी : 384, गिरणा : 3111, पुनद : 709.