Tue, Mar 19, 2019 09:19होमपेज › Nashik › नाशिकचे ७८.१८ दशलक्ष लिटर पाणी मुरते कुठे?

नाशिकचे ७८.१८ दशलक्ष लिटर पाणी मुरते कुठे?

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 25 2018 12:08AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात गंगापूर धरण व दारणा नदीवरील चेहेडी बंधारा येथून दररोज साधारण 430 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उचलले जाते. त्यापैकी जवळपास 351.82 दशलक्ष लिटर इतकेच पाणी ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने 78.18 दशलक्ष लिटर पाणी कोठे मुरते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे 351 पैकी 200 दशलक्ष लिटर पाण्यावरच बिलाची आकारणी होत असल्याने पाण्याची चोरी, गळती व महसुली तफावत थांबविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. 

धरणातून उचलण्यात येणार्‍या पाण्यावर सहा जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहरातील 103 जलकुंभांद्वारे व सुमारे 1800 कि. मी. लांबीच्या जलवाहिन्यांतून सुमारे 20 लाख नागरिकांपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. नागरिकांपर्यंत सुमारे 351.82 द.ल.लि. प्रतिदिन पाणी वितरीत करण्यात येते. 

शहरात मनपाकडे एक लाख 89 हजार 053 नळजोडण्यांची नोंद आहे. त्याद्वारे फक्‍त 200 दशलक्ष लि. प्रतिदिन पाण्याची आकारणी होत आहे. तसेच पाणी पुरवठा व्यवस्था चालविण्यासाठी होणारा खर्च व पाणी पुरवठ्यापासून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने यात मोठी महसुली तफावत आहे. त्यामुळे महापालिकेची पाणी पुरवठा योजना तोटयात असल्याने मनपाने शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेचे पाणी लेखापरिक्षण करुन घेतले आहे. त्यातून शहरातील बहुसंख्य नळ जोडण्यांना असलेले पाणी मिटर नादुरुस्त असून, काही नळ जोडणीधारकांनी मीटर काढून टाकलेले असल्याचे आढळले आहे. 

अन्यथा कडक कारवाई 

नाशिक क्षेत्रातील ज्या नळजोडणीधारकांचे मीटर नादुरुस्त आहेत किंवा मीटर नाहीत अशा नळजोडणी धारकांनी स्वत:हून तातडीने महापालिकेत नियमाप्रमाणे नोंद करुन मीटर दुरुस्त करावे अथवा बदलून घेण्याची कार्यवाही करावी, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पाणी पुरवठा विभागाने दिला आहे. अनधिकृत नळ जोडण्या शोधून अनधिकृत नळ जोडण्या बंद करणे व मिळकतधारक आणि प्लंबर यांच्यावर दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची धडक मोहिम हाती घेतली आहे. 68 अनधिकृत नळजोडण्या शोधून  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.