Thu, May 23, 2019 05:01होमपेज › Nashik › नाशिककरांचे पाणी महागणार

नाशिककरांचे पाणी महागणार

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:54AMनाशिक : प्रतिनिधी

मालमत्तेवर करयोग्य मूल्य दरवाढीप्रमाणेच आता नाशिककरांच्या मानगुटीवर वाढीव पाणीपट्टीचे भूतही आरूढ होणार आहे. सत्ताधारी भाजपाला आणखी एक मोठा दणका देत मनपा प्रशासनाने आदेश जारी केले असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता यापुढील काळात नळजोडणी साइजनुसार पाणीवापर निश्‍चित करून सुधारीत पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे. अशा प्रकारची आकारणी केल्यास पाण्याचा हिशोब बाह्य वीपर कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी पाणीगळती आणि चोरीतून होणारे नुकसान प्रशासन प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणार्‍या नागरिकांच्या खिशातून वसूल करणार आहे. 

प्रशासनाने निवासी, व्यावसायिक व अनिवासी पाण्याचा वापर असे तीन विभागांत ही सुधारीत पाणीपट्टी आकारणी विभागली आहे. त्यानुसार निवासी विभागात कमीत कमी दीडशे रूपये तर जास्तीत जास्त दोन लाख दोन हजार 500 रूपये इतकी सुधारीत आकारणीकेली जाणार असून, व्यावसायिक विभागात कमीत कमी 675 आणि जास्तीत जास्त 10 लाख 93 हजार 500 रूपये तर अनिवासी विभागासाठी पाणीपट्टी कमीत कमी 660 रूपये आणि जास्तीत जास्त आठ लाख 91 हजार इतकी आकारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार सद्यस्थितीत निवासी क्षेत्रात आकारणी होत असलेल्या आणि सुधारीत पाणी वापरात 50 रूपयांपासून ते दोन लाखांपर्यंतची वाढ गृहीत धरली आहे.

व्यावसायिक आणि अनिवासी विभागातील दरही यापेक्षाही तुलनेने अधिक आहे. मनपाने पिण्याच्या पाण्याचे पाणी लेखापरीक्षण, उर्जा लेखापरीक्षण मे. एन. जे. एस. इंजिनिअर्स इंडिया प्रा. लि. कडून करून घेतले आहे. या संस्थेने सादर केलेल्या तांत्रिक अहवालात पाण्याचा हिशोब बाहय वापर (नॉन रेव्हेन्यु वॉटर) 43.08 इतका असल्याचे नमूद केले आहे. पाण्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी संस्थेने शहरातील 20 टक्के पाण्याच्या मीटर कनेक्शनची तपासरी करून नळाच्या आकारानुसार पाणी मोजणी केल्याचा तसेच 43 टक्के इतका हिशोब बाह्य वापर होत असल्याचा दावा केला आहे. सर्वेक्षणानुसार संस्थेने प्रशासनाला सादर केलेल्या अहवालात सुमारे 70 टक्के पाणी मीटर नादुरूस्त, बंद मीटर तसेच मीटर जागेवर नसल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे. तसेच नळकनेक्शन असलेल्या ग्राहकांना सरासरीच बिले दिली जात असल्याने बिले देताना नळजोडणी आकारानुसार ग्राहक पाण्याचा वापर किती करतात हे निश्‍चित करणे आवश्यक आहे. सध्या होत असलेला पाण्याचा वापर आणि त्यानुसार दिलेले जाणारे बिल यात मोठी तफावत असल्याने पाण्याच्या वापराचे सुधारीत परिमाण निश्‍चित करून त्यानुसार पाणीपट्टी आकारणी करण्याची शिफारस संबंधित संस्थेने मनपा प्रशासनाला केली असून, त्यानुसार आता नव्याने सुधारीत पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे. 

नाशिककरांचे मोडणार कंबरडे  

करयोग्य मुल्य दरवाढीचा तिढा सुटत नाही तोच सत्ताधारी भाजपाला प्रशासनाने आणखी एक दणका दिला आहे. करयोग्य मुल्य दराचा अधिकार आपला असून, महासभेचा नसल्याचे मागील आठवड्यातच आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी दावा करून पदाधिकार्‍यांना आव्हान दिले होते. त्यानंतर आता पाणीपट्टीतील मोठ्या दरवाढीने आणखी एक आव्हान उभे ठाकत दणका देऊ केला असला तरी यामुळे मात्र नाशिककरांचे कंबरडे मोडणार आहे. 

अशा प्रकारची सुधारीत पाणीपट्टी आकारणी करण्यापूर्वी प्रस्ताव स्थायी समिती आणि महासभेत सादर करून त्यास मान्यते घेणे गरजेचे आहे. करवाढीनंतर भरमसाठ पाणीपट्टी नाशिककर कशी सहन करणार. याबाबत निर्णय होणे गरजेचे असल्याचे शाहू खैरे म्हणालेे.नाशिककरांचे आर्थिक हित जोपासले जाईल. परस्पर आदेश लागू केला जात असेल तर करयोग्य मुल्य दरानुसार वाढीव पाणीपट्टी आकारणीबाबतही निर्णय घेतला जाईल. आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत. सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेणार असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सागितले.