Fri, Aug 23, 2019 23:13होमपेज › Nashik › ‘जलसमद्धी’ने 319 गावांना शाश्‍वत पाणी!

‘जलसमद्धी’ने 319 गावांना शाश्‍वत पाणी!

Published On: Mar 09 2018 1:35AM | Last Updated: Mar 08 2018 11:09PMसिन्‍नर : प्रतिनिधी

शासन-टाटा ट्रस्ट-युवामित्र संस्थेच्या समन्वयातून जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जलसमृद्धी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत निवड करण्यात आलेल्या तालुक्यातील 52 लघुसिंचन बंधारे आणि धरणातील सुमारे 65 लाख घनफूट गाळ उपसा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जलाशयांचा साठा वाढणार असून, जिल्ह्यातील 319 गावांना पाण्याची शाश्‍वती निर्माण होणार आहे.

जलसमृद्धी कार्यक्रमात सिन्‍नरसह चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, देवळा आदी अवकर्ष तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. गाळ उपसण्यासाठी टाटा ट्रस्टकडून मशीन व इतर कामांसाठी तब्बल 30 कोटींचा निधी पाच वर्षांत दिला जाणार आहे. तर  राज्य शासनाकडून ‘गाळयुक्‍त शिवार व गाळमुक्‍त धरण’, जलयुक्‍त शिवार आणि डबलिंग फार्मर्स इनकम आदींची सांगड घालून डिझेल उपलब्ध करून दिले जाणार आहे. युवामित्र संस्थेच्या काही मशीन जलसमृद्धीमध्ये सहभाग नोंदविणार आहेत.

धरणातून निघणारा गाळ वाहून नेण्याचा खर्च संबंधित शेतकर्‍यांना करावा लागणार आहे. गाळ वितरणाचे नियमन व आर्थिक लोकसहभाग जमा करून त्याचे हिशेब ठेवण्यासाठी प्रत्येक बंधार्‍यावर गाळ उपसा समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमार्फत धरणांपासून तीन किलोमीटरपर्यंतच्या शेतापर्यंत गाळ टाकण्यात येईल. त्यासाठी किलोमीटरनिहाय पैसे संबंधित शेतकर्‍याला अदा करावे लागतील.

गाळ काढल्यानंतर संबंधित धरणावर आधारित पाणीवापर संस्था स्थापन करण्यात येणार आहे. या  संस्थांच्या माध्यमातून सक्षमीकरणातून पाण्याचे व्यवस्थापन व नियमन केले जाणार आहे. सोबतच जलाशयांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी देखील पाणी वाटप संस्थांवर सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे 67 हजार कुटुंबांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी 

उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान, सिन्‍नर तालुक्यात मागील दोन वर्षांपासून जलसमृद्धी कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. तालुक्यातील 32 गावांमधील 58 बंधार्‍यांतून  पाच लाख 24 हजार 512 घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे 6 हजार 620 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. गाळ टाकून अडीचशे एकर जमीन विकसित झाली आहे. तर साडेपाचशे टीसीएमने पाण्याची साठवण क्षमता वाढली.