Wed, Mar 20, 2019 08:34होमपेज › Nashik › ‘पानी फाउंडेशन’ देणार ग्रामस्थांना प्रशिक्षण

‘पानी फाउंडेशन’ देणार ग्रामस्थांना प्रशिक्षण

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:12PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

अभिनेता आमिर खानच्या पानी फाउंडेशनचे स्वयंसेवक येत्या गुरुवारपासून (दि.28) चांदवड आणि सिन्नर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात हे स्वयंसेवक नागरिकांना पाण्याचे महत्त्व, पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून करावयाची कामे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

चांदवड आणि सिन्नर तालुक्यातील टंचाई दूर करण्यासाठी पानी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.  या दोन्ही तालुक्यातील मिळून 41 गावांचा समावेश 2018 च्या वॉटर कप स्पर्धेत करण्यात आला आहे. पुढील वर्षी 8 एप्रिल ते 22 मे या काळात ही स्पर्धा रंगणार असली तरी त्यापूर्वी लोकसहभागातून संबंधित गावांना पाणी अडविणे आणि जिरवण्यासाठी विविध कामे करायची आहेत. ही कामे कशा पद्धतीने करायची आहेत, याबाबत पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ आणि त्यांची टीम सरपंच, ग्रामसेवकासह ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहेत.

वॉटर कप स्पर्धेत पाणीबाबत घेण्यात येणार्‍या कामांमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत सीसीटी, नाला खोलीकरण व रुंदीकरणासह शोषखड्डा तसेच, विविध कामांचा समावेश असणार आहे. स्पर्धेसाठी निवड झालेल्या गावांना सरपंच, तसेच ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने 10 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. स्पर्धेतील राज्यस्तरावरील बक्षीस अनुक्रमे 75 लाख, 50 लाख तसेच 40 लाख रुपये असेल.  

राज्यभरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पानी फाउंडेशन काम करत आहे. फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या कामामुळे सातारा जिल्ह्यातील वेळू गाव पाणीदार झाले होते. दरम्यान, गेल्या दोन वर्षापासून मात्र, नाशिक जिल्ह्याचा या स्पर्धेत सहभाग झालेला नव्हता. परंतु, 2018 मध्ये चांदवड आणि सिन्नर तालुक्यांचा या स्पर्धेत समावेश झाला आहे. भविष्यात या दोन तालुक्यात पाण्यासाठी होणार्‍या कामाचा लाभ जिल्ह्यातील इतर तालुक्यांनाही होईल.

शंभर गुणांची स्पर्धा

पाणी फाउंडेशनतर्फे स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या 41 गावांमध्ये 100 गुणांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यात श्रमदान, माती परीक्षण, जुन्या कामांची दुरूस्ती, आगपेटीमुक्त शिवार आदी विभागांमध्ये गुण देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात काम झाल्यानंतर त्याची नोंदणी अ‍ॅपवर केली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी गावांना त्यांचे गुण तत्काळ कळणार आहेत.