Tue, Apr 23, 2019 00:18होमपेज › Nashik › वॉटर कप स्पर्धा : राजदेरवाडी गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

वॉटर कप स्पर्धा : राजदेरवाडी गावाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 11:36PMचांदवड : वार्ताहर

अभिनेता आमीर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2018 अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी गावाने जलसंधारणाची उत्कृष्ट कामे केल्याने या गावाला तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अमीर खान, किरण राव, जलसंधारण मंत्री राम शिंदे, प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या हस्ते उपसरपंच मनोज शिंदे, ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी स्वीकारला.

तालुक्यातील 39 गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 19 गावांत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करण्यात आली होती. या 19 गावांपैकी राजदेरवाडीचे उपसरपंच मनोज शिंदे, ग्रामसेवक भागवत सोनवणे यांनी गावकर्‍याना संघटित करीत वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यास त्याचा फायदा कसा होतो यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करून पाण्याचे महत्त्व पटवून दिले होते. पर्यायाने ग्रामस्थांनी सकाळी सहा वाजेपासून 11 वाजेपर्यंत व सायंकाळी पाच वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत कसरतीने जलसंधारणाची कामे केली. यात दगडी बांध, चर खोदणे, नाला दुरुस्ती यासारखी मेहनतीची कामे केली. यात गावकर्‍यांनी मन लावून सहभाग घेतला होता.

जलसंधारणाची कामे करण्यासाठी राजदेरवाडीचे उपसरपंच मनोज शिंदे यांनी शाळा, महाविद्यालये, खासगी सामाजिक संस्था, शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना बोलविले होते. शिंदे यांच्या विनंतीस सर्वांनी दाद देत राजदेरवाडी गावात एक दिवस जलसंधारणाची कामे करीत दिवसभर मेहनत केली आहे. यामुळे राजदेरवाडी गावात स्पर्धेदरम्यान करण्यात आलेली जलसंधारणाची सर्व कामे प्रभावीपणे करण्यात आली. राजदेरवाडीचे उपसरपंच मनोज शिंदे, ग्रामसेवक भागवत सोनवणे व ग्रामस्थांच्या मेहनतीमुळेच आज गावाला तालुकास्तरीय 10 लाख रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या पारितोषिक वितरण सोहळ्यास भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, पाणी फाउंडेशनचे जनक सत्यजीत भटकळ, अविनाश पोळ, पोपटराव पवार, चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्‍वर सपकाळे, सुनील पाटील, सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, चेअरमन कैलास शिंदे, नंदराज जाधव, ग्रामसेवक भागवत सोनवणे, दीपक जाधव, जगन यशवंते, जगन जाधव, जगन पवार, बाळू जाधव आदी उपस्थित होते.