Sun, Jul 21, 2019 01:23होमपेज › Nashik › भुजबळांनी दत्तक घेतलेल्या लासलगावला विकासाची प्रतीक्षा

भुजबळांनी दत्तक घेतलेल्या लासलगावला विकासाची प्रतीक्षा

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 23 2018 11:38PMलासलगाव : वार्ताहर

बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अडीच वर्षांनी  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे बाहेर आले आहे. लासलगाव-येवला मतदारसंघाचे आमदार असलेले भुजबळ यांनी लासलगाव हे दत्तक घेतले होते. मात्र, बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडीच वर्षे आत गेल्याने दत्तक घेतलेले लासलगाव विकासाला मुकले होते. मात्र, भुजबळ बाहेर आले असल्याने लासलगाव शहराच्या विकासाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.

आमदार भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास पहिल्या सतरामध्ये लासलगाव 16 गाव पाणीयोजनेला चालना दिल्याने ही योजना कार्यान्वित झाली. भुजबळ यांच्या कार्याची आठवण नागरिकांच्या स्मरणार्थ राहणारच. भुजबळ यांनी विकासकामे सुरू करावी तसेच तातडीने 16 गाव पाणीयोजना दुरुस्तीकडे लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. याचप्रमाणे लासलगाव येथील प्राचीन शिवनदीची स्वच्छता, भुयारी गटार, अद्ययावत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचा अभाव, गाव अंतर्गत रस्ते यासह अनेक विकासकामांच्या प्रतीक्षेत लासलगावकर वाट पाहत आहे.

छगन भुजबळ यांनी ठिकठिकाणी शक्‍तिप्रदर्शन करीत जनतेची सहानुभूती मिळविण्यासाठी भावनिक साद दिली जात आहे. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना सोबत घेण्याचे आश्‍वासन या माध्यमातून भुजबळांनी नाशिक जिल्ह्यात पुन्हा आपले बस्तान बसविण्याची तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील भुजबळ यांचे अनेक शिलेदार हे भाजपा आणि शिवसेनेबरोबर गेले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात हे पुन्हा हातात घड्याळ घालणार का, हे तर येणार्‍या काळात समजेल. मात्र, भुजबळ यांनी दत्तक घेतलेल्या लासलगावच्या विकासाला केव्हा सुरुवात होते, याकडे लासलगाववासीयांचे लक्ष लागलेले आहे. कोणत्याही राजकीय नेत्यासाठी जनतेशी नाळ जोडलेली असणे, किंबहुना तसे भासवणे महत्त्वाचे असते. सक्‍तवसुली संचालनालयाच्या कारवाईत कारागृहात जावे लागल्यानंतरही तशी अलिप्तता जाणवणार नाही, याची खबरदारी भुजबळांनी घेतली होती. त्यांनी कारागृहातून अनेक प्रश्‍न, रखडलेले प्रकल्प आदींबाबत सरकारशी पत्रप्रपंच सुरू ठेवला होता. सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर पाठपुरावा करीत असल्याचे दर्शविले. जामीन मंजूर झाल्यानंतर 26 महिने जनतेशी तुटलेला संवाद भरून काढण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सहा दिवसीय नाशिक दौरा हा त्याचाच एक भाग. त्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा, देवदर्शन या कार्यक्रमांचा समावेश राहिला. येवला येथे त्यांनी भेट देऊन जनतेशी संवाद साधला. 

येवल्यानंतर भुजबळ हे लासलगावमध्ये केव्हा येणार, याकडे शहरवासीयांना उत्कंठा लागलेली आहे. विकासपुरुष अशी ओळख झालेले भुजबळ दत्तक लासलगावचा कायापालट करणार का, याकडे लक्ष लागले आहे.