होमपेज › Nashik › जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMनाशिक : प्रतिनिधी

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात सरासरी 3.46 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जून महिन्यातील काही दिवसच पावसाने हजेरी लावली आहे. सुरुवातीपासून वरुणराजा रुसल्याने खरीप हंगामातील पेरण्याही संथ गतीने सुरू आहेत. सहा लाख 76 हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असले तरी प्रत्यक्षात पेरण्या मात्र 50 टक्क्यांच्या आतच आहेत. समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने बळीराजा चिंतेत आहे. गेल्या महिन्यात पावसाचा प्रभाव दिसला नाही. जुलैचे दहा दिवस झाले तरीही दमदार हजेरी लावलेली नाही. तीन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस धारा बरसल्या नाहीत. सोमवारीही हेच वातावरण कायम होते. पण, पाऊस काही झाला नाही.

जिल्ह्यात 51 टँकर

जिल्ह्यातील 68 गावे आणि 86 वाड्या अशा 154 ठिकाणी 51 टँकरने पाणी पुरविले जात आहे. सर्वाधिक 18 टँकर येवल्यात धावत आहेत. त्या खालोखाल सिन्नरमध्ये 11 तर बागलाणमध्ये 10, मालेगावमध्ये 9 तर देवळ्यात 3  टँकर सुरू आहेत. प्रशासनाने दररोज टँकरच्या 168 फेर्‍या मंजूर केल्या असून, प्रत्यक्षात 131 फेर्‍या होत आहेत. याशिवाय गावांसाठी सात, तर टँकरसाठी चार अशा एकूण 11 विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.