Tue, Apr 23, 2019 14:24होमपेज › Nashik › जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 06 2018 11:36PMनाशिक : प्रतिनिधी

राज्यभरात दमदार हजेरी लावणार्‍या वरुणराजाची जिल्ह्यात प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठा घटला असून, दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 6.31 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकण, मुंबई, नागपूरसह मराठवाड्याला पावसाने तडाखा दिला आहे. नागपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. राज्यातील एकीकडे अशी परिस्थिती असताना नाशिक जिल्ह्यात मात्र, पावसाची प्रतीक्षा आजही कायम आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 6) एकूण 94.3 मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरीत सर्वाधिक 33 मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल सुरगाण्यात 19.2 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पेठमध्ये 19, नाशिकमध्ये 1, दिंडोरी 3, त्र्यंबकेश्‍वरमध्ये 6, मालेगाव, बागलाण व नांदगावमध्ये प्रत्येकी 2 तर देवळ्यात 1.4 मिमी इतका पाऊस झाला. कमी पावसामुळे धरणांमधील साठ्यात घट झाली आहे तर दुबार करण्याची वेळ आल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. दरम्यान, अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनर्रागमन करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलाआहे.