Wed, Jul 24, 2019 12:04होमपेज › Nashik › नांदगाव तालुक्यात 125 शिक्षकांची प्रतीक्षा

नांदगाव तालुक्यात 125 शिक्षकांची प्रतीक्षा

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 12:10AMनांदगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात सर्वात जास्त शिक्षक रिक्‍त राहण्याची वेळ नांदगाव तालुक्यावर यावर्षी देखील उद्भवली आहे. अनेक वर्षांपासून सव्वाशे शिक्षकांची कमतरता तालुक्याला भासत आहेत. तर दहा शाळांना मास्तरच नाही.

तालुक्यातील शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्‍त जागा अनुशेष शिल्लक राहिला असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यात नव्याने भर पडून हा आकडा सव्वाशेपर्यंत जाऊन पोहचला आहे. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या या प्रक्रियेत तालुक्याच्या दहा शाळांना शिक्षकच उपलब्ध नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात 215 प्राथमिक शाळा आहेत अन् त्यासाठी मास्तर मिळत नाही, अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे कुणी मास्तर देता का, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

परिणामी, पालकांकडून शाळांना कुलूप लावण्याची वेळ यंदादेखील कायम राहण्याची शक्यता आहे. बदल्यांच्या या प्रक्रियेत दहा शाळांना शिक्षकच नाही, अशी अवस्था निर्माण झाली. त्यात माळेगाव कार्यातमधील विजयवाडी, गिरणानगर, जामदरी तांडा, साकोरा येथील शिवमळा, जातेगावचे वसंतनगर, मांडवाडची इनामवस्ती, आटकाट तांडा, चिंचविहीरची तुरकुणे वस्ती, कासारी येथील बोरतळावस्ती, जातेगावची पिनाकेश्‍वर वस्ती अशा या दहा शाळांना प्रत्येकी दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, जिल्हा बदली प्रक्रियेत या शाळांना अद्यापही शिक्षक उपलब्ध झालेले नाही. या द्विशिक्षकीय शाळा आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त शिक्षक रिक्‍त राहण्याची वेळ नांदगाव तालुक्यावर यंदाही ओढवली आहे.