Mon, Apr 22, 2019 04:04होमपेज › Nashik › वाडा कोसळून दोघांचा मृत्यू

वाडा कोसळून दोघांचा मृत्यू

Published On: Aug 06 2018 1:53AM | Last Updated: Aug 06 2018 12:06AMनाशिक : प्रतिनिधी

जुने नाशिकमधील जुनी तांबट गल्ली येथील दुमजली काळे वाडा कोसळून ढिगार्‍याखाली दबलेल्या दोन युवकांचा मृत्यू, तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.5) दुपारी एकच्या सुमारास घडली. समर्थ संजय काळे (21) आणि करण राजेश घोडके (21, दोघे रा. जुनी तांबट गल्ली) असे मृत झालेल्या युवकांची नावे आहेत. सुमारे पाच तासांच्या बचावकार्यानंतर ढिगार्‍याखाली फसलेल्या पाचही जणांना बाहेर काढण्यात आले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय काळे (60), काजल संजय काळे (19) आणि चेतन पवार (21) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे शहरातील जुन्या वाड्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला असून, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करून ते खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनास दिले आहेत. 

जुनी तांबट गल्लीच्या मागील बाजूस असलेल्या म्हसरुळ टेक येथे अतुल काळे यांचा वाडा असून, त्यात अनेक वर्षांपासून काळे कुटुंबीय राहतात. वाड्यातील भिंतीतून माती पडत असल्याची बाब काळे कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी वाड्यातील संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी काळे कुटुंबीय आणि मित्रपरिवार घरातील संसारोपयोगी वस्तू काढत होते. दुपारी एकच्या सुमारास वाडा अचानक कोसळला. त्याखाली पाचही व्यक्‍ती दबल्या गेल्या. याची माहिती अग्निशमन दलास समजताच तातडीने शिंगाडातलाव येथील कर्मचारी हॅजमेट रेस्क्यू व्हॅन, अति जलद प्रतिसाद वाहनाने घटनास्थळी निघाले.

तसेच, पंचवटी उपकेंद्र आणि कोणार्कनगर उपविभागीय मुख्यालयातूनही रेस्क्यू व्हॅनसह जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, जुन्या नाशिकमधील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशामक दलाची गाडी म्हसरुळ टेकपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शंभर मिटरवर असलेल्या शिवाजी चौकात वाहने उभी करून कर्मचार्‍यांनी ढिगार्‍याखाली दबलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. लिफ्टिंग बॅग, इलेक्ट्रॅनिक कटर, सिमेंट कटर, वुडकटरच्या माध्यमातून बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर संजय काळे (60) व चेतन पवार (22) यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत समर्थ, करण आणि काजल या तिघांनाही बाहेर काढले. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले तर समर्थला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, करणचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान समर्थचाही मृत्यू झाला. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., आ.देवयानी फरांदे, आ. बाळासाहेब सानप, महापालिका आयुक्‍ततुकाराम मुंढे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने अग्निशामक दलाने पाच तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. यात एस. के. बैरागी, डी. बी. गायकवाड, जे. एस. अहिरे, आर. एस. नाइक, टी. आय. शेख, एम. एम. शेख, एस. एस. आगलागे आदी कर्मचार्‍यांचा समावेश होता. 

मदतकार्यात अडथळे 

जुने नाशिकमधील तांबट गल्ली ते म्हसरुळ टेक या परिसरात अत्यंत अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती, बघ्यांची झालेली गर्दी यामुळे अग्निशामक दलास मदतकार्य करताना अनेक अडथळे आले. मुख्य रस्त्यावरुन रेस्क्यू व्हॅन पोहचत नसल्यामुळे पर्यायी रस्त्याने वाहने वळविण्यात आली.

मनपाचे साहित्य ठरले निष्फळ

महापालिकेच्या अग्निशामक पथकाने तातडीने मदतकार्य सुरु केले. मात्र, यासाठी वापरात येणारे साहित्य निष्फळ ठरले. काळे वाडा कोसळल्यानंतर तेथे शिरण्यासाठी जागा नव्हती. पाठीमागील दरवाजाचे कुलूप आणि साखळी तोडण्यासाठी कर्मचार्‍यांनी पेट्रोल कटरचा वापर केला. मात्र, त्यातून साखळी तुटली नाही. अखेर स्थानिक फेब्रीकेशन काम करणारे इम्रान अन्सारी यांच्याकडील गॅस कटरचा वापर करून दरवाजा तोडून कर्मचारी आतमध्ये शिरले व बचावकार्यास सुरुवात केली. 

पालकमंत्री, आयुक्‍तांची मदत

घटनेची माहिती समजताच पालकमंत्री गिरीश महाजन आणि मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्यासह इतर अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पालकमंत्री महाजन आणि आयुक्‍त मुंढे यांनी स्वत: बचाव कार्यात सहभागी होत मदत केली.

तर जीवितहानी टळली असती... 

वाडा कोसळत असल्याची माहिती अग्निशमन दलास 12.30 च्या सुमारास कळवण्यात आली. त्यानुसार विभागाच्या चार कर्मचार्‍यांनी तातडीने वाड्याची पाहणी केली. त्यावेळी वाड्यातील दगड कोसळत असल्याने कर्मचार्‍यांनी काळे कुटूंबियांसह त्यांच्या मित्रांना तातडीने बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानुसार चार कर्मचारी आणि परिसरातील 7 नागरिक लगेच बाहेर आले. मात्र खालील मजल्यावर काळे कुटूंबिय आणि चेतन व करण हे पाच जण साहित्य काढत होते. सर्व कर्मचारी बाहेर आल्यानंतर त्यांनी वाड्याकडे पाहिले. मात्र काही क्षणातच सर्वांच्या डोळ्यासमोर वाडा कोसळला आणि त्याखाली दबून समर्थ आणि करणचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेली धोक्याची सूचना वेळीच पाळली असती तर जिवितहानी टळली असती, अशी हळहळ व्यक्‍त होत आहे.