Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Nashik › अश्‍लील वर्तन करणारा जि. प. शिक्षक बडतर्फ

अश्‍लील वर्तन करणारा जि. प. शिक्षक बडतर्फ

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 10:50PMनाशिक : प्रतिनिधी

विद्यार्थिनीशी अश्‍लील वर्तन केल्याचा आरोप चौकशीत सिद्ध झाल्याने निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक निंबाजी काकुळते यांना बडतर्फ करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी घेतला आहे. या निर्णयाने गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणार्‍या शिक्षकांना जरब बसणार असल्याचा विश्‍वास व्यक्‍त करण्यात आला.

काकुळते हे देवीचा माथा या शाळेत कार्यरत असताना 27 सप्टेंबर 2016 ला इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीशी त्यांनी अश्‍लील वर्तन  केले होते. मधल्या सुट्टीत शाळेच्या आवारात घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली होती. तसेच, कामकाजाबाबतही बर्‍याचशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना मारहाण करीत असल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला होता. या सर्व तक्रारींची गटशिक्षणाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. सादर करण्यात आलेल्या अहवालात काकुळते यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 चे भाग 4 मधील कलम 7 नुसार बडतर्फ करण्यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. काकुळते यांनी सादर केलेला खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश गिते यांनी दिले आहेत.