Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › दृष्टिहीन युवक करणार सायकलवारी

दृष्टिहीन युवक करणार सायकलवारी

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 11 2018 11:16PMउपनगर : वार्ताहर

पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकर्‍यांसाठी एक अप्रूप असते. त्याचप्रमाणे दृष्टिहीन असलेल्या वारकर्‍याला नाशिक सायकलिस्ट असोसिएशनची साथ मिळाल्याने तो आता पंढरीला जाऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहे. प्रसाद उतेकर हा नाशिक ते पंढरपूर सायकल प्रवास करणार असून, या सायकल प्रवासात तो सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे.

मुंबई येथे वास्तव्यास असणारा प्रसाद उतेकर हा 27 वर्षीय युवक अनेक वर्षांपासून सायकलस्वारी करत आहे. नाशिकला तो एका सामाजिक उपक्रमात आलेला असताना त्याची ओेळख येथील सायलिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी डॉ. मनीषा रौंदळ यांच्याशी झाली. त्यांनी या सायकलवेड्या दृष्टिहीन प्रसादला सायकलवारीची संकल्पना सांगितली. प्रसादनेही सायकलवारीबाबत असणार्‍या बाबी उत्सुकतेने जाणून घेत लगोलग सायकलवारीमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्‍त केली. त्यानुसार प्रसादला सायकलवारीचे निमंत्रण मिळाले आहे.

नॅब या अंधांच्या संस्थेत पेपर डिझाइनचे काम करणारा प्रसाद डॉ. मनीषा रौंदळ यांच्या टेन्डम सायकलवर पंढरपूरवारीला रवाना होणार आहे. या वारीमध्ये तो नेत्रदानाचा संदेश देणार असून, या वर्षाच्या सायकलवारीमध्ये दृष्टिहीन असणारा तो एक वारकरी आहे. सध्या प्रसाद नाशिकमध्ये या टेन्डम सायकलवर डॉ. मनीषा यांच्याबरोबर सराव करीत असून, एकाच वेळी पॅन्डल मारणे, तोल सांभाळणे अशा गोष्टींचा सराव तो करत आहे. या सायकलचे हॅण्डल मनीषा रौंदळ सांभाळणार असून, खास वारीसाठी त्यांनी ही सायकल खरेदी केली आहे.