होमपेज › Nashik › कोकणींच्या उमेदवारीने दराडे, सहाणेंना झटका 

कोकणींच्या उमेदवारीने दराडे, सहाणेंना झटका 

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:44PMनाशिक : प्रतिनिधी

माघारीनंतर विधान परिषद निवडणुकीचे चित्र वेगळेच निर्माण झाल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मनातील घालमेल वाढली आहे. कारण परवेझ कोकणी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले असले तरी त्यांचा आणि भाजपाचा घरोबा पाहता कोकणी हे दोन्ही उमेदवारांना टक्कर देणारे ठरू शकतात. 

निवडणुकीत कोण कुणाचे मतदार फोडेल यावरच सर्व काही अवलंबून आहे. शिवसेनेने आधीच स्वबळाची भाषा करून भाजपाचा रस्ता मोकळा केलेला आहे. यामुळे भाजपाचे सदस्य आणि नगरसेवकांची मते निर्णायक ठरू शकणार असल्याने त्यांना भाव येणे साहजिकच आहे. खरे तर अगदी सुरुवातीपासून नाशिक विधान परिषदेची निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता अधिक होती आणि तसे गणित धरूनच उमेदवारांकडून रणनीती ठरविली गेली होती. परंतु, अचानकपणे परवेझ कोकणी यांनी उमेदवारी अर्ज भरून सर्वांनाच जोर का झटका दिला. उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत कोकणी हे कदाचित माघार घेऊ शकतात. आणि त्यासाठी प्रयत्नही झाले. परंतु, राजकारणात मुरब्बी असलेल्या कोकणींनी आणखी दुसरा धक्का दिला ते निवडणुकीतील रिंगणात कायम राहून. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ते भाजपाच्या संपर्कात आल्याने तेव्हापासूनच विधान परिषदेसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. यामुळे भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही तरी त्यांच्याकडे भाजपाचे उमेदवार म्हणूनच पाहिले जात आहे. भाजपाने या निवडणुकीत दुहेरी चाल खेळली आहे.

अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर न करता उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरविला आहे. यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे. भाजपाच्या दृष्टीने कोकणी यांची उमेदवारी इतरांना वरचढ ठरणार असली तरी दुसर्‍या अर्थाने भाजपाची डोकेदुखीदेखील ठरू शकते. कारण अधिकृत उमेदवारी नसल्याने भाजपाचे मतदार तूर्तास तरी बांधील नाही. यामुळे ते कुणाला मतदान करतात यावर सर्व काही चित्र अवलंबून राहणार आहे. कोकणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अगोदरपासूनच फिल्डिंग लावून ठेवलेली होती. ना. महाजन यांनी तर कोकणी यांच्याकडे पाहुणचारही घेतला होता. यामुळे कोकणी यांची उमेदवारी तेव्हाच ठरलेली होती, असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.शिवसेनेला न डिवचता भाजपाने कोकणी यांच्या रूपाने निवडणुकीत मोठा स्पर्धक उभा करून ठेवला आहे. यामुळे नरेंद्र दराडे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार सहाणे यांना ही निवडणूक नाही म्हटले तरी महाग पडू शकते.