Wed, Jul 24, 2019 07:50होमपेज › Nashik › ना सुविधा, ना प्रशिक्षण... तरी विजयची एक्स्प्रेस सुसाट!

ना सुविधा, ना प्रशिक्षण... तरी विजयची एक्स्प्रेस सुसाट!

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:51PM

बुकमार्क करा
नाशिक : रवींद्र आखाडे

अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षणानंतर कोणी एक वेळ क्रीडा प्रकारात पुढे येईलही; पण प्रतिकूल परिस्थितीत निव्वळ इच्छाशक्‍तीच्या बळावर कोणी राष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटवत असेल, तर त्याच्या जिद्दीचे अप्रूपच मानायला हवे. शहरातील हनुमानवाडी भागात राहणार्‍या विजय चंद्रकांत शेवरे या 24 वर्षीय आदिवासी कुटुंबातील धावपटूने हे शक्य करून दाखविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या मविप्र मॅरेथॉनमध्ये विजयने अवघ्या दोन तास 45 मिनिटांत 42 किमीचे अंतर कापले अन् टॉप टेन धावपटूंत स्थान पटकावले, तेही कोणाच्या मार्गदर्शनाविना! 

पंचवटीतील हनुमानवाडी येथे एका सर्वसामान्य कुटुंबात आई-वडिलांसोबत राहणार्‍या विजयला एक भाऊ आणि दोन विवाहित बहिणी आहेत. परिस्थितीअभावी त्याला बारावीनंतर शिक्षण अर्धवट सोेडावे लागले. वडील आणि भाऊ इलेक्ट्रिकची कामे करतात. विजयदेखील या कामात त्यांना मदत करतो. विजयला वडिलांकडून धावण्यासाठी प्रोत्साहन मिळते. दोन वर्षांपूर्वी पोलीस भरतीची तयारी करणार्‍या मित्रामुळे विजयला धावण्यात रुची निर्माण झाली. तेव्हापासून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळालेले नसतानाही केवळ स्वत:च्या बळावर विजयने मॅरेथॉन स्पर्धेसाठी तयारी केली.

गेल्या वर्षी त्याने मविप्र मॅरेथॉनमध्ये 17 वा क्रमांक मिळविला होता. पुढच्या वर्षी पहिल्या पाचमध्ये यायचेच, असा निर्धार करीत विजयने तयारी केली होती. मात्र, यंदा केवळ काही मिनिटांच्या फरकाने त्याचे पहिल्या पाचमधले स्थान हुकले आणि त्याने सातवा क्रमांक पटकावला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर दररोज दीड तास सरावाच्या बळावर त्याने ही कामगिरी केली. सरावात आणखी सातत्य ठेवून पुढच्या वर्षी मविप्र मॅरेथॉनचा विजेता होण्याचा मानस विजय व्यक्‍त करतो. आता डोंगर चढाईची तयारी करणार असल्याचे त्याने  दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.  

हलाखीची परिस्थिती असणार्‍या विजयला आर्थिक पाठबळ आणि चांगला प्रशिक्षक लाभल्यास तो ‘नाशिक एक्स्प्रेस’ ठरू शकतो. जिल्ह्यातील सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, पदाधिकारी यांनी विजयला हातभार लावल्यास जिल्ह्याला धावण्याच्या स्पर्धेत खर्‍या अर्थाने ‘विजय’ मिळू शकतो. विजयच्या यशाची दखल घेत मराठा विद्या प्रसारक संस्थेबरोबरच हनुमान तरुण मित्रमंडळ, हनुमानवाडी सार्वजनिक वाचनालय आदी संस्थांनी त्याचा गौरव केला आहे.

‘हिल ट्रेक’चा सराव करणार

मित्रामुळे लागलेली धावण्याची सवय माझी आवड बनली. मग सराव सुरू केला. कान्हेरे मैदानावर दररोज दीड तास न थांबता धावतो. गेल्या वर्षी प्रथमच मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. केवळ 42 कि. मी. अंतर पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले होते. ते पूर्ण केलेही. यंदा हे अंतर पूर्ण करून पहिल्या पाचमध्ये येण्याचे ठरविले होते. पण, दोन क्रमांकांनी मागे राहिलो. आता ‘हिल ट्रेक’चा सराव सुरू करणार असून, आणखी अंतर कापताना 20 ते 25 मिनिटे कमी कशी होतील, यावर लक्ष केंद्रित करणार आहे.  - विजय शेवरे, धावपटू, हनुमानवाडी, नाशिक