Wed, Jul 17, 2019 18:03होमपेज › Nashik › ‘पानिपत’चा इतिहास देदीप्यमान

‘पानिपत’चा इतिहास देदीप्यमान

Published On: Aug 20 2018 1:38AM | Last Updated: Aug 19 2018 10:30PMनाशिक : प्रतिनिधी

पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्याने दोनशे वर्षे हा इतिहास उपेक्षित राहिला. 1960 पासून त्याला उजाळा मिळाला व आता नवनव्या गोष्टी उजेडात येत आहेत. पानिपत हा मराठ्यांच्या पराक्रमाचा देदीप्यमान इतिहास असून, त्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ लेखक डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले.

ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास (सांस्कृतिक विभाग) यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमातील व्याख्यानात ते बोलत होते. शंकराचार्य संकुल येथे रविवारी (दि. 19) झालेल्या व्याख्यानात डॉ. कुलकर्णी यांनी ‘पानिपत : 14 जानेवारी 1761’ या विषयाचा ऐतिहासिक पट उलगडून दाखविला. ते म्हणाले, पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यातील अनेक कंगोरे आता समोर येत आहेत. पानिपतमध्ये असताना मराठ्यांना महाराष्ट्रातून पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली. तिकडून इकडे आलेली पत्रेच अभ्यासासाठी उपलब्ध झाली. त्यामुळे एकतर्फी इतिहासाची मांडणी झाली. सन 1761 मध्ये ही लढाई झाल्यानंतर पुढील दोनशे वर्षे या विषयावर बोलणे टाळले गेले. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम अंधारातच राहिला. 1960 नंतर बखरींच्या आधारे त्या इतिहासाला उजाळा मिळाला. तो महाराष्ट्राबाहेरही सर्वदूर पोहोचावा, यासाठी आपण इंग्रजीत पुस्तक लिहिले. 

यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी सन 1707 पासून तयार होत गेलेली पानिपतच्या लढाईची पार्श्‍वभूमी चित्रफितीच्या आधारे कथन केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांची सत्ता क्षीण होत गेली व मराठ्यांनी मोठा साम्राज्य विस्तार केला. तिकडे अफगाणची स्थापना केल्यानंतर अहमदशहा अब्दालीला पैशांची गरज भासू लागली. त्यामुळे त्याने पंजाब, हरियाणामार्गे दिल्लीत धडक दिली. त्याच्या सैन्याशी सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी निकराची झुंज दिल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 

यावेळी शंकराचार्य न्यासाचे विश्‍वस्त प्रमोद भार्गवे, सुनीत पोतनीस, गिरीश टकले, डॉ. नारायण विंचूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. वसंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.