Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Nashik › मार्केटच्या कामासाठी पालिकेसमोर थाटला भाजीबाजार

मार्केटच्या कामासाठी पालिकेसमोर थाटला भाजीबाजार

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:01PMमनमाड : वार्ताहर

मनमाड नगर परिषदेच्या परिसरात असलेली  उघड्यावर मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात यावी यासाठी उपोषण आणि सावित्रीबाई फुले मार्केटचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी पालिकेच्या प्रवेशद्वारसमोर भाजीपाल्याची दुकाने थाटून दोन वेगवेगळी आंदोलने एकाच वेळी करण्यात आली. यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेल्या ‘जिंदाबाद-मुर्दाबाद’, ‘पालिका प्रशासन हाय हाय’, ‘कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’, ‘अभी नही तो कभी नही’ आदी घोषणांनी पालिकेचा परिसर दुमदुमून गेला होता.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले डेली भाजी मार्केटचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट आहे. मार्केटचे काम रखडल्यामुळे भाजीपाला, फळे धान्य यासह इतर विक्रेत्यांना वेगवेगळ्या रस्त्यावर दुकाने थाटावी लागतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच याशिवाय दुकानदार आणि ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मार्केटचे रखडलेले काम पूर्ण करण्यात यावे यासाठी अनेक वेळा मोर्चे, धरणे, उपोषण यासारखे आंदोलने करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी पालिका प्रशासनातर्फे केवळ आश्‍वासन देण्यात आले. मात्र, कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे आरपीआयचे नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर भाजीपाल्याची दुकाने थाटून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत मार्केटचे काम सुरू केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, दिलीप नरवडे, दिनकर धिवर, कैलाश आहिरे, विनोद आहिरे, गुरू निकाळे, पी. आर. निळे, मोजेस साळवे, शिवेसना शहरप्रमुख मयूर बोरसे, सुनील पाटील, जाफर मिर्झा, मुस्लिम विचार मंचचे फिरोज शेख आदी उपस्थित होते.

दुसरे आंदोलन शहरात उघड्यावर करण्यात येत असलेल्या मांस विक्रीची दुकाने बंद करण्यात यावी या मागणीसाठी  माजी नगराध्यक्ष रहेमान शहा यांनी उपोषण सुरू केले आहे. उघड्यावर मांस विक्री करण्यास कोर्टाने बंदी घातलेली असताना देखील शहरात ठिकठिकाणी मांस विक्रीची दुकाने सुरू आहेत. ही दुकाने बंद करण्यात यावी. यासाठी शहा यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले. त्यांना जैन व मारवाडी समजासह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी डॉ. सागर, दादा बंब, सुरेश बारसे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.