होमपेज › Nashik › सोनेवाडीत विवाहितेवर सामूहिक अत्याचार 

सोनेवाडीत विवाहितेवर सामूहिक अत्याचार 

Published On: Jan 14 2018 2:16AM | Last Updated: Jan 14 2018 2:04AM

बुकमार्क करा
वावी : वार्ताहर

सिन्‍नर तालुक्यातील सोनेवाडी येेथे घरात मुलांसोबत झोपलेल्या विवाहितेवर दोघांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी (दि.12) रात्री घडली. गावातीलच दोघांनी हा प्रकार केला असून, पीडितेच्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना शनिवारी (दि.13) सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चितेगाव फाटा (निफाड) येथून ताब्यात घेऊन सिन्‍नर तालुका न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

पीडित विवाहिता पती व दोन लहान मुलांसोबत सोनेवाडीत राहते. शुक्रवारी तिचा पती घरी नसल्याचे हेरत पीडितेच्या पतीच्याच दोन मित्रांनी हा प्रकार केला. त्यामुळे घटना उघडकीस आल्यापासून सोनेवाडीत तणावाची स्थिती आहे. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास घराच्या पाठीमागच्या बाजूच्या स्वयंपाकघराचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून पीडिता जागी झाली. कशाचा आवाज आला हे पाहण्यासाठी ती गेली असता, हेमंत ऊर्फ बबलू सुनीलसिंग परदेशी (30) व बाळासाहेब ऊर्फ बाजीराव बबन बर्डे (30) (दोघे रा. सोनेवाडी) हे समोर उभे असल्याचे तिला दिसले. दोघांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला होता. घाबरलेल्या पीडितेने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, तिचे तोंड दाबून धरत व तिला धमकावत दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर दोघांनीही पाठीमागील दरवाजानेच पळ काढला. स्वतःला कसेबसे सावरत पीडितेने घराबाहेर पडून शेजार्‍यांना जागे केले व आपबिती कथन केली. बाहेरगावी गेलेल्या तिच्या पतीला तातडीने बोलवून घेत वावी पोलिसांना कळवण्यात आले. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास वावी पोलिसांचे गस्तीपथक व पाठोपाठ सहायक निरीक्षक रणजित आंधळे घटनास्थळी पोहोचले. आंधळे यांनी सूचित केल्यावर निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिर्‍हे, सिन्‍नरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, एमआयडीसी ठाण्याचे हरिभाऊ कोल्हे, दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक संगीता गिरी हेदेखील तातडीने सोनेवाडीत दाखल झाले.

पीडितेच्या माहितीवरून दोन्ही संशयितांचा लागलीच शोध घेण्यात आला. मात्र, ते मिळून आले नाहीत. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. उपनिरीक्षक गिरी यावेळी सोबत होत्या. शनिवारी सकाळी वावी पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक आंधळे घटनेचा तपास करत आहेत.  शनिवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांनी सहकार्‍यांसोबत सोनेवाडी येथे येऊन संशयितांबद्दल माहिती घेतली व त्याआधारे चितेगाव येथून सकाळी 7 च्या सुमारास दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.