Sun, Jul 21, 2019 15:06
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › वसाका भाडेतत्त्वावर देणे राजकीय षडयंत्र : आहेर

वसाका भाडेतत्त्वावर देणे राजकीय षडयंत्र : आहेर

Published On: Sep 03 2018 1:41AM | Last Updated: Sep 03 2018 1:41AMदेवळा : वार्ताहर

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यामागे शिखर बँक आणि आमदार डॉ. राहुल आहेर यांची मोठी खेळी आहे, असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष माजी आमदार शांताराम आहेर यांनी केला आहे.

वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद  आणि  कामगारांनी  करार रद्द करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन  आहेर यांनी केले आहे. वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने या पार्श्‍वभूमीवर त्यांनी रविवारी (दि.2) देवळा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

वसाकाची सद्यस्थिती, सहवीजनिर्मिती प्रकल्पातूनच  येणार्‍या पैशांच्या माध्यमातून वसाकाचे सर्व कर्ज अवघ्या सात ते आठ वर्षांत फिटणार असताना वसाका 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देणे म्हणजे  सभासदांची, ऊस उत्पादकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा डाव  असल्याचे सांगत शांताराम आहेर यांनी सभासद, ऊस उत्पादकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. वसाकासाठी न्यायालयात जाण्याची तयारी करावी, असे आहेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तीन वर्षांत दोन वेळा गळीत हंगाम सुरू करण्यात आलेला असताना नियोजनशून्य कारभारामुळे कारखान्यावर 40 कोटी रुपये कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. त्याला विद्यमान प्राधिकृत मंडळ जबाबदार आहे, अशी टीका आहेर यांनी केली. त्यांनी म्हटले की, सहकारी कायद्यानुसार कोणत्याही प्राधिकृत मंडळाला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी सत्तेत राहण्याचा अधिकार नसतो. शासनाच्या मेहरबाणीने  गेल्या तीन वर्षांपासून प्राधिकृत मंडळ वसाकाचा कारभार सोडण्यास तयार नाही. वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा महत्त्वाचा निर्णय  घेत असताना कोणत्याही वृत्तपत्रात सर्वसाधारण सभेची नोटीस देण्यात आलेली नव्हती. घाईगर्दीत मोजक्याच, मर्जीतल्या  सभासदांना बोलावून भाडेतत्त्वावर कारखाना चालविण्यास देण्याचा  ठराव आ. डॉ. आहेर यांनी केला. नुकतीच झालेली सर्वसाधारण सभा  बेकायदेशीर असल्याचे आहेर यावेळी म्हणाले.

ऊस उत्पादक, कामगार, ऊस वाहतूकदार यांच्यामध्ये प्रभारी कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांच्याविषयी तीव्र असंतोष असताना व नियोजनशून्य व भ्रष्ट कारभारामुळे कारखाना डबघाईस येत असतानाही प्राधिकृत मंडळाने त्यांना पाठीशी घातले, असाही आरोप माजी शांताराम आहेर यांनी यावेळी केला. यावेळी वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.