Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Nashik › ‘वसाका’ भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव संमत

‘वसाका’ भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव संमत

Published On: Aug 29 2018 1:43AM | Last Updated: Aug 28 2018 10:36PMदेवळा : वार्ताहर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देत आहे. त्यात आपल्या सर्वांचा कोणताही अधिकार नसताना राज्य सहकारी बँक व खासगी मालक यांच्यात समन्वय घालून ऊस उत्पादक व कामगारांना त्यांची देणी लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, अशी ग्वाही वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी दिली. दरम्यान, वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगार यांचे हक्‍क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्त्वावर खासगी व्यापार्‍यास चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (दि. 8) वसाका कार्यस्थळावर झालेल्या विशेष सभेत संमत करण्यात आला. त्यास उपस्थित सर्व सभासद, कामगारांनी हात उंचावून संमती दर्शविली.

वसाकाने मागील दोन वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले असून, वसाकाला कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळण्याची परिस्थिती नसल्याने अखेर राज्य सहकारी बँकेने वसाकाला खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कारखान्याचे, ऊस उत्पादक सभासद, सभासद व कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच कारखान्याच्या सभासदांच्या मालकीला कुठेही बाधा लागणार नाही, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू, असेही आमदार आहेर यांनी यावेळी सांगितले.  वसाका भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात येथील श्रीराम मंदिरात वसाकाचे ऊस उत्पादक सभासद, कामगार व प्राधिकृत मंडळाची संयुक्‍तरीत्या विशेष सभा बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आहेर होते.

यावेळी माजी आमदार शांताराम(तात्या) आहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, माजी कामगार संचालक विलास सोनवणे, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, रामकृष्ण जाधव, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलासकाका देवरे, राजेंद्र पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, वसाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, कारभारी बिरारी, राजेंद्र देवरे, कुबेर जाधव, शशिकांत निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, डॉ. पोपटराव पगार आदींनी मनोगत व्यक्‍त केले. वसाका खासगी तत्त्वावर चालविण्यास देत असताना कारखान्याच्या हिताला बाधा लागणार नाही तसेच ऊस उत्पादकांना, कामगारांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली.

या विशेष सर्वसाधारण सभेसाठी नाशिक जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर, वसाकाचे माजी चेअरमन शांतारामतात्या आहेर, संतोष मोरे, जिल्हा बँकेचे संचालक  धनंजय पवार, मविप्रचे संचालक अशोक पवार, देवळा बाजार समितीचे सभापती बापू देवरे, माजी संचालक नारायण पाटील, वसंतराव निकम, अण्णा शेवाळे, बाळू बिरारी, कृष्णा बच्छाव, अशोक वाघ, ग्यानदेव बच्छाव, यशवंत पाटील, बाबूराव पाटील,  महेंद्र हिरे, माजी सभापती आत्माराम भामरे, दगडू भामरे, विलास निकम, देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार, युवानेते संभाजी आहेर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, सचिव रवींद्र सावकार आदी उपस्थित होते. कुबेर जाधव यांनी सूत्रसंचालन केले.