Wed, Mar 20, 2019 23:04होमपेज › Nashik › ..ऐन वसंतात नाराजीची गिते

..ऐन वसंतात नाराजीची गिते

Published On: May 11 2018 1:42AM | Last Updated: May 10 2018 11:23PMनाशिक : कुंदन राजपूत

शिवसेनेनंतर मनसे आणि आता भाजपा असा प्रवास करणारे वसंत गिते हे लवकरच भाजपाला ‘रामराम’ ठोकतील अशी जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर गिते हे काही नगरसेवक सोबत घेऊन भाजपाला खिंडार पाडतील, असा संदेश फिरत आहेत. गिते हे या वृत्ताचे खंडन करीत असले तरी दस्तुरखुद्द भाजपामधूनच अशी वावडी उठवली जात आहे. एकूण राजकीय परिस्थिती बघता गिते हे लवकरच राजकीय प्रवासाचे वर्तुळ पूर्ण करतील, अशी चर्चा असून, ‘ऐन वसंतात नाराजीची गिते’, हा चर्चेचा विषय ठरत आहे.

‘रामायण’मध्येही भाकरी फिरवली जाणार असून, सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने महापौर व उपमहापौर हे बदलले जाणार असून, ‘नवा गडी नवे राज’ सुरू होईल. प्रथमेश गिते हे उपमहापौर पदावरून पायउतार झाल्यानंतर वसंत गिते हे नवीन राजकीय इनिंग खेळण्याच्या मूडमध्ये असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. सोशल मीडियावरदेखील गिते हे भाजपाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तांना पेव फुटले आहे. मागील दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर गिते हे भाजपातील त्यांचे समर्थक नगरसेवक घेऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असे संदेश फिरत आहेत. सध्या गिते यांची भाजपात शोभेचे पद म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेश उपाध्यक्षपदी बोळवण केली गेलेली आहे. ही त्यांच्या कार्यकर्त्यांची सल आहे. सत्ता असूनही गितेंचे महामंडळ अथवा इतर पदावर पुनर्वसन केले गेले नाही. गतवर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत पहिल्या खेपेत त्यांचे पुत्र प्रथमेश हे नगरसेवक म्हणून निवडून आले.

उपमहापौरपदी त्यांची वर्णी लावण्यात आली. हा अपवाद वगळता भाजपात गिते यांना डावलण्याची भूमिका स्थानिकांकडून सुरू आहे. भाजपात भविष्य  उज्ज्वल नसल्याने अनेकजण पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या मनःस्थितीत असल्याचे समजते. हिरे परिवाराची वणवण हे त्याचे बोलके उदाहरण ठरावे. गिते हे मनसेत असताना ‘मध्य नाशिक’चे आमदार होते. सध्या या जागेवर प्रा. देवयानी फरांदे या विद्यमान आमदार आहेत. मागील काही दिवसांपासून गिते व फरांदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असून, त्याचा भडका होता होता राहिला. भाजपाकडून प्रा. फरांदे यांनाच उमेदवारी दिली जाईल. त्यामुळे नाशिक मध्य मतदारसंघाकडे डोळे लावलेले गिते नवीन राजकीय इनिंग खेळण्याची तयारी करत असल्याची चर्चा भाजपाच्या गोटातच रंगली आहे.