Wed, Jun 26, 2019 17:39होमपेज › Nashik › त्र्यंबकेश्‍वरी भरला वारकर्‍यांचा मेळा

त्र्यंबकेश्‍वरी भरला वारकर्‍यांचा मेळा

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 12 2018 11:28PM

बुकमार्क करा
त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

शैव व वैष्णवांच्या वैचारिक समन्वयाचे मूळ केंद्र असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तिनाथांच्या पौष वारीसाठी राज्यभरातून दिंड्या घेऊन आलेले पाच लाखांहून अधिक वारकरी निवृत्तिनाथांच्या चरणी नतमस्तक झाले. हजारो भाविकांनी केलेली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, नाथांच्या दर्शनासाठी लागलेली लाखो भाविकांची रीघ व सायंकाळी नाथांच्या पादुकांची चांदीच्या रथातून निघालेली भव्य मिरवणूक यामुळे ब्रह्मगिरीच्या कुशीत जणू वैष्णवांचा मिनी कुंभमेळा भरल्याची अनुभूती येत होती.

यंदा यात्रेचे नियोजन करताना नाथांच्या समाधीकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. संत निवृत्तिनाथांच्या यात्रेत यंदा प्रथमच विक्रमी 600 च्या वर दिंड्यांचे आगमन झाले. गावाच्या चहूबाजूंनी दिंड्या उतरल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

कुशावर्तावर अखंड स्नान

ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यास निघण्यापूर्वी संत निवृत्तिनाथांच्या समाधी दर्शनासाठी वारीत उभे राहण्यापूर्वी वारकरी कुशावर्तात स्नान करीत असल्याने तेथे प्रचंड गर्दी झाली होती. वस्त्रांतरगृहदेखील अपुरे पडत असल्याने कुशावर्ताच्या चहूबाजूंनी भाविकांना अक्षरश: रस्त्यावरच कपडे बदलावे लागत होते.

गजानन महाराज संस्थेने केली वारकर्‍यांची सेवा

संत निवृत्तिनाथांची यात्रा पार पाडणे, नगरपालिका व निवृत्तिनाथ समाधी मंदिर संस्थेची जबाबदारी असताना गजानन महाराज संस्थेच्या सेवकांनी निवृत्तिनाथ मंदिरात सफाईपासून वारकर्‍यांचे दर्शन सुलभ होण्यासाठी रात्रंदिवस पहारा दिला. त्याचबरोबर संस्थेने वारकर्‍यांसाठी महाप्रसाद, तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

पालकमंत्र्यांना घोषणेचा विसर; प्रसाद योजनेचे घोडे अडले कुठे?

त्र्यंबकेश्‍वर तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी पंढरपूर, शेगावप्रमाणे, किंबहुना त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने विकास करण्यासाठी संत निवृत्तिनाथ समाधी मंदिरासोबतच ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्‍वर मंदिर या क्षेत्रांच्या विकासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणूक, तसेच धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने त्र्यंबकेश्‍वरच्या विकासासाठी निधी दिला जाणार असल्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री गिरीश  महाजन यांनी केली होती. परंतु, दोन वर्षांत स्वतंत्र अधिकारी व निधी या फक्त घोषणाच ठरल्या असल्याची चर्चा वारकर्‍यांमध्ये होती. मागील वर्षी महापूजेसाठी उपस्थित असलेले खासदार हेमंत गोडसे यंदा मात्र महापूजेस गैरहजर राहिल्याची चर्चा वारकर्‍यांत होती.

पादुका, प्रतिमेची भव्य मिरवणूक

संत निवृत्तिनाथ संस्थानतर्फे तयार करण्यात आलेल्या चांदीच्या रथातून सायंकाळी 5 वाजता नाथांच्या पादुका व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगांच्या साथीने नाथांच्या घोषणेमुळे संपूर्ण त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली होती. तेली गल्ली, पाटील गल्लीमार्गे रथ त्र्यंबकराजाच्या मंदिराकडे नेण्यात आला. तेथे मंदिरात प्रतिमा, पादुका  नेण्यात आल्या. रथाचे मानकरी देहूकर व बेलापूरकर यांचे निवृत्तिनाथ मंदिरात भजन झाले. तेथून लक्ष्मीनारायण चौकातून रथयात्रा कुशावर्तामार्गे समाधी मंदिराकडे गेली.