Sat, Jul 11, 2020 22:45होमपेज › Nashik › कुलूप तोडून घेतला वसंत मार्केटच्या टेरेसचा ताबा 

कुलूप तोडून घेतला वसंत मार्केटच्या टेरेसचा ताबा 

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 11:45PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या वसंत मार्केट या इमारतीच्या टेरेसवर बिल्डरने केलेले अनधिकृत बांधकाम तसेच उभारलेल्या मोबाइल टॉवरचा मुद्दा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वादळी ठरला. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत सभा नंतर घ्या आधी टेरेसचा ताबा घ्या, अशी मागणी केली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक सर्व सभासदांनी एकत्र येत वसंत मार्केटच्या टेरेसकडे कूच केले. संतप्त सभासदांनी गेट व कुलूप तोडत टेरेसचा कब्जा घेतला. संबंधित बिल्डरकडून भाडे वसूल करा अन्यथा फौजदारी कारवाई करा असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.

व्ही. एन. नाईक संस्थेच्या रविवारी (दि.24) पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण  सभेत गोंधळाची परंपरा अबाधित राहिली. अध्यक्षस्थानी कोंडाजी आव्हाड होते. सभेच्या प्रारंभीच विरोधकांनी वसंत मार्केटच्या टेरेसवर बिल्डरने केलेल्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. संस्थेच्या मालकीची जागा श्यामराव केदारे यांना मार्केट बांधण्यासाठी देण्यात आली होती. मार्केटचा पहिल्या मजल्याचा एफएसआय हा बिल्डरला विकण्यात आला होता.

मात्र, मार्केटच्या टेरेसची मालकी ही संस्थेकडे होती. असे असताना केदार यांनी संस्थेला विचारत न घेता मार्केटच्या टेरेसवर अनधिकृत जीम व श्‍वानघर बांधले तसेच या ठिकाणी जागा भाड्याने देऊन मोबाइल टॉवर उभारले. मागील सहा वर्षांपासून या माध्यमातून मिळणारे भाडे केदार यांनी लाटल्याचा आरोप करत विरोधकांनी केला. संस्थेच्या मालकीची जागा कोणत्याही परिस्थितीत परत घ्या, या मागणीसाठी सभासद आक्रमक झाले. त्यामुळे सभा आटोपती घेत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत वसंत मार्केटकडे धाव घेत हल्लाबोल केला. तेथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय जिन्याद्वारे सभासदांनी थेट मार्केटच्या टेरेसवर धडक दिली. आक्रमक सभासदांनी टेरेसचे गेट तोडून काढण्याचा प्रयत्न केला. नंतर हातोडीद्वारे कुलूप तोडून सर्वांनी प्रवेश करत टेरेसचा ताबा घेतला.

गोंधळातच विषयांना मंजुरी

सभेच्या कामकाजात गोंधळातच संस्थेचा 2015-16 चा अहवाल व 2016-17 आर्थिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. संतोष काथार यांनी सभासदांना ओळखपत्र द्यावे, वारसदारांना सभासद करून घ्यावे, घटना बदल करून संचालक मंडळाची संख्या कमी करावी, अशी मागणी केली. अ‍ॅड. पी. आर. गिते यांनी कबड्डी लीग ऐवजी शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अशी सूचना मांडली. मनाजे बुरकुले यांनी अहवाल उशिराने वाटप झाल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. ज्येष्ठ सदस्य पंढरीनाथ थोरे यांनी आर्थिक ताळेबंदातील हिशेबावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून खुलासा मागितला.

आ. सानप व शेट्टी सोबत

सभा सुरू झाल्यानंतर आमदार बाळासाहेब सानप यांचे विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्यासोबत आगमन झाले. मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे संस्थेच्या तीन महाविद्यालयांना लवकरच मान्यता मिळणार असल्याचे आमदार सानप यांनी सभेला मार्गदर्शन करताना सांगितले. संस्थेने पुढाकार घेऊन सभागृह व विद्यार्थ्यांसाठी होस्टेल बांधावे. त्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा करून व आर्थिक मदत करण्याचे आश्‍वासन आ. सानप यांनी यावेळी दिले.