Fri, Jul 19, 2019 18:30होमपेज › Nashik › ‘आयमा इंडेक्स’चा उपयोग आदिवासींच्या विकासासाठी व्हावा : ना. विष्णू सावरा

‘आयमा इंडेक्स’चा उपयोग आदिवासींच्या विकासासाठी व्हावा : ना. विष्णू सावरा

Published On: Jan 20 2018 1:40AM | Last Updated: Jan 19 2018 11:33PMनाशिक : प्रतिनिधी

माझे कार्यक्षेत्र आदिवासी व ग्रामीण भाग असून, प्रदर्शनात आल्यावर मला अवघडल्यासारखे वाटत असले तरी मी स्वार्थासाठी या ठिकाणी आलो आहे. माझ्या आदिवासी भागाच्या विकासासाठी ‘आयमा इंडेक्स’ प्रदर्शनाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केली.

डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या ‘आयमा इंडेक्स’ प्रदर्शनाला शुक्रवारी (दि.19) सायंकाळी ना. सावरा यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, आयमा अध्यक्ष राजेंद्र आहिरे, प्रदर्शनाचे अध्यक्ष धनंजय बेळे आदी उपस्थित होते. ना.सावरा म्हणाले, शासन मोठ्या प्रमाणात आश्रमशाळा, वसतिगृह चालविते. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व इतर उत्पादनाची आवश्यकता असते. त्यासाठी टेंडर प्रकियेमुळे विविध उपाय योजना राबविताना विलंब होतो.

जर, उद्योजकांनी आम्हाला मदत केली तर टेंडर कालावधी, पैसा व वेळेची बचत होईल. आदिवासी भाग व तेथील नागरिकांच्या विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे. शासनाकडून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी ना.सावरा यांनी उद्योजकांना दिली. यावेळी उद्योजकांनी आदिवासी विभागात कोणते प्रकल्प राबविता येतील याचे सादरीकरण केले.

इगतपुरी, पालघरला क्रीडा प्रबोधनी

इगतपुरी व पालघर या दोन्ही ठिकाणी क्रीडा प्रबोधनी उभारली जाईल, अशी माहिती ना.सावरा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. इगतपुरी येथे प्रबोधनीसाठी जागा खरेदी केली आहे. दोन्ही ठिकाणी प्रबोधनी झाली तर चांगलीच बाब असल्याचे ते म्हणाले. शिवाय ग्रामीण भागात कुपोषणाची मोठी समस्या आहे. शासनाकडून कुपोषणमुक्तीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. यापुढे विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्यावर त्यांची आरोग्य तपासणीकेली जाईल. त्यामुळे काही अंशी तरी कुपोषणाच्या समस्येवर मात करता येईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.?