Thu, Jul 18, 2019 06:11होमपेज › Nashik › सुषमा अंधारे यांच्या वाहनावर हल्ला

सुषमा अंधारे यांच्या वाहनावर हल्ला

Published On: May 03 2018 4:12PM | Last Updated: May 03 2018 4:12PMनाशिकरोड : वार्ताहर 

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर भीमा-कोरेगाव प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करणार्‍या सुषमा अंधारे यांच्या चारचाकी वाहनावर मध्य प्रदेश येथे हल्ला झाला, अशी तक्रार खुद्द अंधारे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी पुढील तपासाकरिता गुन्हा मध्य प्रदेश पोलिसांकडे वर्ग केला आहे. 

दि. 1 मे रोजी अंधारे व्याख्यानानिमित्त मध्य प्रदेशातील इंदूर येथील वैष्णवी लॉन्स येथे व्याख्यानासाठी गेल्या होत्या. रात्री 10 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर त्या चालक योगेश लोखंडे, रविराज गुट्टे यांच्यासोबत एमएच 15 ईबी या चारचाकी वाहनामधून परतीच्या प्रवासाकडे निघाल्या. मात्र, रस्ता माहीत नसल्याने कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मनोज गर्डे (रा. इंदूर) यांनी रस्ता दाखवून देतो, असे सांगत गर्डे हे अंधारे यांच्या बरोबर निघाले. गर्डे यांनी अंधारे यांना कार्यक्रम स्थळापासून ते विजयनगर चौकापर्यंत सोडले. मुंबई -आग्रा बायपास येथील मृदंग हॉटेलजवळ अंधारे यांचे चारचाकी वाहन आले. यावेळी रात्रीचे 12 वाजले होते. पाठीमागून नंबरप्लेट नसलेल्या एका चारचाकी वाहनाने अंधारे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

अचानक पाठीमागून धडक बसल्याने अंधारे यांच्यासह वाहनातील त्यांचे सहकारी वाहन थांबवून धडक दिलेल्या वाहनाच्या दिशेने धावले, परंतु चालकाने दोघांच्या दिशेने वाहन नेऊन पुन्हा अंधारे बसलेल्या वाहनाला धडक दिली. चालक लोखंडे आणि गुट्टे यांनी प्रसंगावधान राखले आणि  पुन्हा त्यांच्या वाहनात बसले. वाहन पुढे नेत असताना त्यांच्या वाहनाला पुन्हा तिसर्‍यांदा धडक दिली. आपल्यावर कोणीतरी जीवघेणा हल्ला करीत असल्याचे अंधारे तसेच त्यांचा सहकार्‍यांच्या लक्षात आले. त्यांनी घटनास्थळावरून तातडीने वाहन जोरात सुरक्षित स्थळी हलविले. रस्त्यामध्ये कोठेही वाहन न थांबवता थेट नाशिक गाठले. नाशिकला आल्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. पुढील तपास मध्य प्रदेशचे पोलीस करणार आहेत.

Tags : Sushma Andhare,  Atrocity Complaint, Bhide, Ekboot