होमपेज › Nashik › आयुक्‍त मुंढेंविरोधात अविश्‍वासाच्या हालचाली

आयुक्‍त मुंढेंविरोधात अविश्‍वासाच्या हालचाली

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 1:16AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत नाशिक महापालिकेत मोठ्या राजकीय उलथापालथी पाहावयास मिळणार आहेत. शुक्रवारी (दि.24) सायंकाळी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या झालेल्या गोपनीय बैठकीत अनेक खलबते झाली. 

फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या आयुक्‍तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनच आयुक्‍त मुंढे हे वादात आणि चर्चेत राहिले आहेत. नगरसेवकांचा निधी रद्द करणे, महासभेत प्रस्ताव न आणता परस्पर निविदा प्रक्रिया राबविणे, आमदारांच्या निधीतील कामांना डावलणे, करयोग्य मूल्य दर लागू करणे, अंगणवाड्या बंद करणे, कंत्राटी कामगार कमी करणे, महासभेचा निर्णय होऊनही त्यास न जुमानणे, महापौर आणि पदाधिकार्‍यांच्या अधिकारांवर गदा आणणे यासह अनेक बाबींमुळे आयुक्‍त मुंढे यांच्या विरोधात संपूर्ण नगरसेवक आणि पदाधिकारी एकवटले आहेत. याशिवाय सिडकोतील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठीदेखील आयुक्‍तांनी मोहीम हाती घेतल्याने सिडकोतील नागरिकांनी शासनाविरुद्ध असंतोष व्यक्‍त केला होता. 

सोमवारी पुन्हा बैठक 

या सर्व बाबींच्या पार्श्‍वभूमीवर सर्वपक्षीय गटनेत्यांसह इतर पदाधिकार्‍यांची रामायण या महापौरांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात अविश्‍वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेत गटनेत्यांच्या स्वाक्षर्‍याही प्रस्तावावर करण्यात आल्या. तसेच स्थायी समितीच्या 16 पैकी 11 सदस्यांच्या स्वाक्षर्‍या झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आता सोमवारी (दि.27) पुन्हा याबाबत बैठक होऊन चर्चा केली जाणार आहे.