होमपेज › Nashik › मुंढेंविरोधात सत्ताधार्‍यांची अविश्‍वासाची तयारी

मुंढेंविरोधात सत्ताधार्‍यांची अविश्‍वासाची तयारी

Published On: Apr 17 2018 1:52AM | Last Updated: Apr 17 2018 1:52AMनाशिक : प्रतिनिधी

करवाढ आणि मोकळे भूखंड व शेतजमिनीवर करयोग्य मूल्य आकारणीचा निर्णय घेतल्याने सत्ताधारी भाजपाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्यापूर्वीच भाजपाचे मनपातील पदाधिकारी व नगरसेवकांनी ‘आयुक्‍त हटाव’ची मागणी भाजपा पदाधिकार्‍यांकडे केली असून, त्याविषयी खलबते सुरू झाली आहेत. नवी मुंबईप्रमाणे आयुक्‍त आणि नगरसेवक असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आयुक्‍त मुंढे आल्यापासून नगरेसवक तसेच पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत. प्रभागातील कामे रद्द करण्याचा निर्णय नगरेसवकांच्या जिव्हारी लागला होता. नगरसेवक निधी देण्यास नकार देत अंदाजपत्रकात केलेली वाढही आयुक्‍तांनी धुडकावून लावली. आमदार सानप यांच्या निधीतील फुलेनगर  येथील ड्रेनेजचे काम थांबविण्यात आले होते. आता या कामास मंजुरी दिली असली तरी त्याची रक्‍कम कपात केल्याने ही बाब आमदारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची झाली आहे, तर दुसरीकडे या सर्व गोष्टींवर मात करत आयुक्‍तांनी शहरातील मिळकती, मोकळी मैदाने, शेतजमिनींवर करवाढ केल्याने शहरात नागरिक व शेतकर्‍यांमध्ये आगडोंब उसळला आहे. करयोग्य मूल्यवाढमुळे सत्ताधारी भाजपा अडचणीत सापडला असून, नागरिकांना काय उत्तर द्यावे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आधीच दत्तक नाशिकचे विधान त्यात नागरिकांवर कराचा बोजा निर्माण झाल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत सापडले आहे. अशा स्थितीत 2019 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मनपातील निर्णयांचा विपरीत परिणाम होऊन त्याच्या विरोधात रूपांतर होऊ नये म्हणून आता भाजपाने सावध पवित्रा घेत आयुक्‍तांच्या विरोधातच पाऊल उचलले आहे. त्यादृष्टीने करवाढीच्या विरोधात शेतकर्‍यांच्या बैठकांना आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे या हजेरी लावून शेतकर्‍यांची बाजू घेत आहेत.

Tags : Nashik, Unbelief, Motion, against, Munde