Fri, Mar 22, 2019 01:29
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › टेरेस, तळमजल्यातील हॉटेल्सचे सर्वेक्षण करा 

टेरेस, तळमजल्यातील हॉटेल्सचे सर्वेक्षण करा 

Published On: Jan 02 2018 1:12AM | Last Updated: Jan 01 2018 11:53PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी 

मुंबईतील कमला मिल कपाउंडमध्ये रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेल्या अनधिकृत हॉटेलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणात विनापरवानगी टेरेस व तळमजल्यांमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू असून, मुंबई दुर्घटनेची शहरामध्ये पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विभागीय अधिकार्‍यांनी तत्काळ टेरेस व तळमजल्यामधील हॉटेलांचे सर्वेेक्षण करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत केली. 

मुंबई व पुणे महापालिकेने तातडीने टेरेसवरील अनधिकृत हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना नाशिक महापालिकेने या दुर्घटनेतून कोणताही धडा घेतला नाही. शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोडसह विविध भागांत मोठ्या प्रमाणात इमारतीच्या टेरेसवर व तळमजल्यांमध्ये अनधिकृतरीत्या हॉटेल, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर सुरू आहेत. टाउन प्लॅनिंग व अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सर्व टेरेसवरील हॉटेल्स ही विनापरवाना सुरू असल्याचा दावा बोरस्ते यांनी केला.

महापालिकेने परवानगी दिली नसताना अन्न व औषध प्रशासनाने टेरेसवर हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली कशी, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. महापालिकेने शहरातील सर्व हॉटेलांचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडे अग्निशमनचा परवाना, सुरक्षिततेच्या उपाययोजना आहे की नाही याची पाहणी करावी. हॉटेलचालकांकडे परवानगी अथवा आवश्यक कागदपत्रे नसल्यास त्यास अन्न व औषध विभागास व महापालिका विभागीय अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बोरस्ते यांनी केली. तसेच, टेरेसवर व तळमजल्यांमध्ये विनापरवाना हॉटेल सुरू असल्याचे आढळल्यास त्यांना आर्थिक दंड आकारून अधिकृत करून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

तर आयुक्‍तच जबाबदार 

आगीच्या दुर्घनटेनंतर मुबंई व पुणे या शहरांमध्ये आयुक्तांनी पुढाकार घेऊन अनधिकृत हॉटेलचालकांवर कारवाई सुरू केली आहे. नाशिकमध्येदेखील ही कारवाई होणे अपेक्षित होते. स्मार्ट सिटीबरोबरच सुरक्षित नाशिकला प्राधान्य देणे गरजेचे आहे.   भविष्यात नाशिकमध्ये दुर्घटना घडल्यास त्यास आयुक्त जबाबदार राहील, असे बोरस्ते यांनी सांगितले.