Fri, Apr 26, 2019 17:28होमपेज › Nashik › मार्किंग करणार्‍या कर्मचार्‍यांना पिटाळले

मार्किंग करणार्‍या कर्मचार्‍यांना पिटाळले

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:33PMसिडको: प्रतिनिधी

महापालिकेने  शहराप्रमाणेच सिडकोलाही सारखेच नियम असल्याचे जाहीर करून त्याप्रमाणे अनधिकृत बांधकामांचे मार्किंग सुरू केले. मात्र ब्रह्मगिरी चौकातील काही नागरिकांनी कडवा विरोध करत मनपा अधिकारी व कर्मचार्‍यांना पिटाळून लावले. दरम्यान, या नागरिकांचा विरोध होण्यापूर्वी मनपाने 50 अनधिकृत घरांच्या अतिक्रमणांचे मार्किंग पूर्ण केले. 

महापालिकेने सिडकोत  सुमारे 25 हजार घरे अतिक्रमित म्हणून घोषित केले. यानंतर मनपा आयुक्‍तांचा सिडकोत संभाजी स्टेडीयम येेथे ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम झाला. यावेळी आयुक्‍तांनी नागरिकांना अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु सिडकोवासीयांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु आयुक्त मुंढे यांनी केलेल्या आदेशानुसार मनपा नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास  उत्तमनगरमधील ब्रह्मगिरी चौकामध्ये अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी लाल रंगाने मार्किंग करण्यास सुरूवात केली. यावेळी प्रथम  नागरिकांना काही समजले नाही. 

यानंतर मात्र जसजशी माहिती पसरली तेव्हा महिला व  नागरिक जमा झाले व त्यांनी अधिकार्‍यांना घेराव घालत मार्किंग करण्यास विरोध केला आणि मार्किंग बंद पाडले.  नागरिकांचा विरोध पाहून अधिकारी व कर्मचारी यांना नाईलाजाने माघारी परतावे लागले.