होमपेज › Nashik › सेनापती तात्या टोपे स्मारकाच्या जागेबाबत एकमत

सेनापती तात्या टोपे स्मारकाच्या जागेबाबत एकमत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

येवला : प्रतिनिधी

1857 च्या स्वातंत्र्य समराचे थोर सेनानी सेनापती तात्या टोपे यांचे येवल्यात साडेदहा कोटी रुपये खर्चाचे भव्य स्मारक निर्माण होत आहे. हे स्मारक नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील जलसंपदा विभागच्या पालखेड कॉलनीलगत व्हावे, यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीने कंबर कसली असून, जागेबाबत समन्वय घडावा यासाठी समितीने आयोजित केलेल्या बैठकीत स्मारकाच्या जागा बदलाबाबत एकमत झाले. पालकमंत्र्यांनी ठरवले तरच स्मारकाच्या जागा बदलाची प्रक्रिया होईल, असा सूर नगराध्यक्षांसह सर्वांनी काढल्याने आता स्मारकाच्या जागा बदलाचा चेंडू पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कोर्टात टोलवला गेला.

समन्वयाने पाठपुरावा करण्याचे धोरण या बैठकीत ठरवण्यात आले. येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात शुक्रवारी आयोजित समन्वय बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, उद्योगपती सुशील गुजराथी, संघचालक मुकुंद गंगापूरकर, माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, सेनानेते संभाजीराजे पवार, प्रभाकर झळके, समिती अध्यक्ष आनंद शिंदे, श्यामसुंदर काबरा होते.

माजी नगराध्यक्ष समितीचे सरचिटणीस भोलानाथ लोणारी यांनी केंद्र व राज्य शासनाने सेनापती तात्या टोपे स्माराकासाठी साडेदहा कोटींची योजना दिली. पालिकेने शहर पाणीपुरवठा साठवण तलावालगतची जागा स्माराकासाठी निश्‍चित करून तसा ठरावही केला. शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून 2050 पर्यंतची शहराची लोकसंख्या विचारात घेऊन पुढच्या पाणीटप्पा नियोजनासाठी पालिकेने स्मारकासाठी प्रस्तावित केलेल्या जागेची गरज पडणार आहे, अशी भूमिका मांडली.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका शीतल शिंदे यांनी स्मारकासाठी जलसंपदा विभागाची जागा योग्यच असल्याचे सांगून येवल्याच्या वैभवात भर घालणारे तात्या टोपे यांचे स्मारक येथेच व्हावे, असे सांगितले.
नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी निधी परत जाऊ नये म्हणून हा ठराव वरिष्ठांच्या सांगण्यावरून केल्याचे मत मांडले.पालकमंत्री व शासन स्मारकासाठी जागा द्यायला तयार असेल तर आम्ही समितीबरोबर असल्याचे मत नगरसेवक रुपेश लोणारी यांनी मांडले.

सेना नेते संभाजीराजे पवार यांनी पालिकेने ठराव केलेली जागा अयोग्य असून, समितीने सुचवलेली जलसंपदा विभागाची जागा स्मारक होण्यासाठी शिवसेना समितीबरोबर असल्याचे सांगितले.समितीचे अध्यक्ष आनंद शिंदे यांनी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन व प्रशासनाच्या माध्यमातून सर्व शक्‍तिनिशी पाठपुरावा सुरू असून, स्मारकाच्या जागा बदलाची प्रक्रिया वेगाने चालू झाल्याचे नमूद केले.

तीन दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठवला

पालिकेची भूमिका स्पष्ट करताना नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी सांगितले, पालखेडची जागा मिळवण्यासाठी सहा महिने प्रयत्न केले. अखेर स्मारकाचा निधी परत जाऊ नये म्हणून साठवण तलावालगतच्या पालिकेच्या मालकीच्या जागेचा ठराव केला. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जागेबाबतचा निर्णय ठरवावा. स्मारकाच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली असून, प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव तीन दिवसांपूर्वी पाठवला आहे.


  •