Sat, Jul 20, 2019 13:47होमपेज › Nashik › उमराणे ग्रामस्थांचे बस रोको आंदोलन

उमराणे ग्रामस्थांचे बस रोको आंदोलन

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 10:19PMउमराणे : वार्ताहर 

येथील राष्ट्रीय महामार्गावरील बसथांब्यावर नाशिकसह सर्व विभागाच्या बसेसला थांबा देण्यात यावा व रामदेवजीबाबा फाटा मार्गे जाणार्‍या बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्या, या मागणीसाठी बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे यांच्या नेतृत्वाखाली उमराणे ग्रामस्थांच्या वतीने बस रोको आंदोलन छेडण्यात आले.

नाशिक व मालेगाव विभागाच्या वाहतूक नियंत्रकांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात येणार होते. परंतु  बस थांबत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी अचानक बस रोको आंदोलन केले. 18 ते 20 हजार लोकसंख्या असलेले उमराणे गाव हे परिसरातील आठ ते दहा खेड्यांचे दळणवळणाचे केंद्रबिंदू असून, राज्य परिवहन मंडळाच्या बसेस येथेे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्याचप्रमाणे मालेगाव, कळवण, धुळे आगाराच्या बहुतांश बसेस रामदेवजी फाटा मार्गे जात असल्याने उमराणे येथील शालेय विद्यार्थ्यांना देवळा, कळवण, मालेगाव येेथे जाण्यास वेळेवर बस उपलब्ध होत नाही.  यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होतात.  

रामदेवजीबाबा मार्गे जाणार्‍या सर्व बसेस उमराणेमार्गे वळविण्यात याव्यात, याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून परिवहन मंडळाकडे लेखी निवेदने देण्यात आले होते. मात्र, परिवहन मंडळाकडून या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने शेवटचा पर्याय म्हणून ग्रामस्थांच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता. संबंधित विभागाकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली नसल्याने  बस रोको आंदोलन छेडले. या आंदोलनाची दखल घेत नाशिक विभागाचे सहायक वाहतूक अधीक्षक व्ही. व्ही. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक वाय. बी. पवार, एस. व्ही. चित्राव, मालेगाव विभागाचे वाहतूक नियंत्रक एम. डी. पाटील, एस. डी. महाजन, वाहन परीक्षक पी. एस. देवरे यांनी आंदोलनाच्या एक दिवस आधीच आदोलनकर्त्यांशी चर्चा करून नाशिक-इगतपुरी, धुळे-इगतपुरी या गाड्यांना तत्काळ थांबा देण्यात येणार असून, नांदगाव-सप्तशृंगगड ही गाडी उमराणेमार्गे वळविण्याचे आश्‍वासन दिले. तसेच थांब्यावर पंधरा दिवसांसाठी एका वाहतूक नियंत्रकाचीही नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पं. स. सदस्य धर्मा देवरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे, नंदन देवरे, हेमंत देवरे, उमेश देवरे, भगवान देवरे, भाऊसाहेब देवरे आदी उपस्थित होते.