Thu, Jan 17, 2019 18:26होमपेज › Nashik › अखेर 17 अनधिकृत शाळांना अंतिम नोटीस

अखेर 17 अनधिकृत शाळांना अंतिम नोटीस

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 17 2018 10:11PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने अखेर पिंपरी-चिंचवड शहरातील 17 अनधिकृत शाळांना अंतिम नोटिस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 दिवसांच्या आत खुलासा मागविला आहे. खुलासा न करणार्‍या शाळा चालकांवर दंडाची, तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे व प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी गुरुवारी (दि.16) दिली. 

शहरात बिनदिक्कतपणे अनधिकृतपणे शाळा सुरू केल्या जातात. त्याला शासनाची मान्यता नसल्याने कारवाईनंतर या शाळा बंद होऊ शकतात. त्यामुळे त्या शाळामध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती असते. अशा अनधिकृत शाळांची यादी पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी जाहीर केली जाते. मात्र, कारवाई काहीच केली जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. यासंदर्भात ‘पुढारी’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध केले आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा शहरात एकूण 19 अनधिकृत शाळा जाहीर केल्या होत्या. त्यापैकी 2 शाळांनी राज्य शासनाची मान्यता घेतली आहे. उर्वरित 17 शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून येत्या 4 दिवसांमध्ये खुलासा मागविला आहे.

मुदतीमध्ये खुलासा न केल्यास त्या अनधिकृत शाळाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. एक लाख रुपये दंड आणि त्यापुढेही शाळा सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसाला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचबरोबर आवश्यकता वाटल्यास फौजदारी कारवाई केली जाईल. या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.

या आहेत 17 अनधिकृत शाळा

ग्रँट मीरा स्कूल, मोशी, स्मार्ट स्कूल, मोशी-प्राधिकरण, इंद्रायणी स्कूल, साई पार्क, दिघी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, मोशी, मास्टर केअर स्कूल, आळंदी रस्ता, भोसरी,  ग्रँट मीरा स्कूल, चिखली, जयश्री स्कूल, चर्‍होली, मरिअम स्कूल, भोसरी, ज्ञानराज प्राथमिक स्कूल, कासारवाडी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी, सेंट मेरीज ज्युनिअर प्रायमरी स्कूल, पिंपळे निलख, शुंभकरोती इंटरनॅशनल स्कूल, गांधीपेठ, चिंचवड, एंजल्स प्राथमिक स्कूल, पिंपळे निलख, मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी, ब्ल्यू रोज इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड, पर्ल ड्रॉप स्कूल, पिंपळे निलख (सर्व इंग्रजी माध्यम शाळा). बालगोपाल माध्यमिक शाळा, पिंपरी (मराठी माध्यम शाळा).